नवी दिल्ली : तुम्ही ट्रेनने प्रवास करत असालच. आपल्याला अनेकदा अनुभव येतो की, ट्रेन नेहमीच उशीरा येते. कधी ५ ते १० मिनिटं उशीर होतो तर कधी तासभरही लागतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला असा एक किस्सा सांगणार आहोत जो ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.
जापानमध्ये एक ट्रेन ठरलेल्या वेळेपूर्वी केवळ २० सेकंद आधी स्टेशनवरुन निघाली. मात्र, या प्रकारामुळे कंपनीला माफी मागावी लागली आहे.
आपल्या चांगल्या रेल्वे सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या जापानमध्ये ही घटना घडली आहे. जापानची राजधानी टोकियोमधील अकिहाबरा आणि इबारकी प्रांतातील सुकुबा दरम्यान सुकुबा एक्सप्रेस धावते. या एक्सप्रेसचं काम टोकियो-एरिया मेट्रोपॉलिटन इंटरसिटी रेल्वे कंपनी पाहते.
मंगळवारी जापानमधील मिनामी नागरेयामा स्टेशनवर नेहमीप्रमाणे ट्रेन दाखल झाली. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.४४ मिनिटांनी ट्रेन सुटते. मात्र, मंगळवारी ट्रेन ९ वाजून ४३ मिनिटं आणि २० सेकंदांपूर्वी स्टेशनवरुन निघाली. मंगळवारी झालेल्या या फेरबदलाचा केवळ काही यात्रेकरुंनाच कळालं असेल.
ट्रेन नियोजित वेळेपूर्वी स्टेशनवरुन निघाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला कळताच संबंधित कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर या घटनेसंदर्भात माफी मागितली.
टोकियो-एरिया मेट्रोपॉलिटन इंटरसिटी रेल कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, ट्रेन आपल्या नियोजित वेळेपूर्वी रवाना झाली. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. प्रवाशांना झालेल्या या असुविधे संदर्भात आम्ही माफी मागतो".