Israel-Hamas war : गाझा पट्टीतील हमास (Hamas) या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर (Israel) केलेल्या हल्ल्यात शेकडो इस्रायली नागरिक ठार झाले आहेत. त्यामुळे गाझापट्टीत (Gaza Strip) पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. तर दुसरीकडे, हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या प्रतिहल्लात 198 नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टिनने केला आहे. या सगळ्यात दोन्ही बाजूकडील 1610 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यांचे धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच इस्रायली महिलांचे अपहरण होत असल्याचाही एक खळबळजनक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इस्रायलमध्ये घुसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक मुलींचे अपहरणही केल्याचं म्हटलं जात आहे. असाच एक व्हिडीओ गाझा पट्टीजवळून समोर आला आहे ज्यामध्ये हमासचे दहशतवादी एका मुलीला मोटारसायकलवरून घेऊन जात आहेत. व्हिडीओमध्ये ती मुलगी मदत मागत आहे. ही मुलगी तिच्या प्रियकरासोबत एका पार्टीत सहभागी होण्यासाठी आली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
25 वर्षीय नोआ अर्गमानी किबुत्झमध्ये आली होती. यानंतर हमासने शनिवारी अचानक हल्ला केला. त्यानंतर पॅलेस्टिनी सैनिकांनी तिला उचलून बाईकवर बसवले. मला मारू नका, मला मारू नका, असे ती ओरडत होती. मुलीचा प्रियकर अवी नाथन यालाही दहशतवाद्यांनी पकडून बेदम मारहाण केली. मात्र त्यानंतर नाथनसुद्धा बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या भावाने दिली आहे. आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत आहोत पण संपर्क करू शकत नाहीये, असे नाथनच्या भावाने म्हटलं आहे.
دختری که در ویدئوی وحشتناک از تروریستهای حماس بود، نوآ نام دارد.
نوآ دیشب در یک فستیوال موسیقی در جنوب اسرائیل با دوستانش بود و امشب معلوم نیست کجاست و تروریستها با او چه کردند.
کنار مردم اسرائیل هستیم #اسرائیل#Israel pic.twitter.com/qhLTnNvL76
— Pouria Zeraati (@pouriazeraati) October 7, 2023
लोकांचे अपहरण का करतात?
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू कल्पना करू शकतील त्यापेक्षा जास्त इस्रायली लोकांना कैद करण्यात आल्याचा दावा हमासने केला आहे. इस्त्रायलच्या तुरुंगात बंद असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांना सोडवण्यासाठी हे दहशतवादी लोकांचे अपहरण करत आहेत. हमास हे इस्रायलला कैद्यांची सुटका करण्यास सांगत आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
पॅराग्लायडर्स आणि मोटरबोट व्यतिरिक्त हमासचे दहशतवादी बाईकवरूनही इस्रायलच्या सीमेत घुसले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 400 हून अधिक इस्रायली नागरिक ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर 5000 रॉकेट डागले होते. त्यानंतर इस्रायलच्या रस्त्यांवर मृतदेह विखुरले गेले होते. या हल्ल्याला इस्रायलनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इस्रायली लष्कर आणि हमासमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. इस्रायली लष्करी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलच्या सात वसाहतींमध्ये आणि लष्करी तळांवर घुसखोरी केली. दहशतवादी स्डेरॉट शहरातही घुसले आहेत.