जेरूसलेम : इस्रायलच्या फौजांनी गाझा पट्टीतला सीमेपलीकडून हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक सुरूंग नष्ट केलाय.
इस्रायलच्या फौजांशी लढताना डावपेचाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या या सुरूंगांचे सूत्रधार आहेत हमास ही पॅलेस्टीनी दहशतवादी संघटना. अमेरीकेने जेरूसलेमला इस्रायलची राजधानी घोषीत केल्याच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टीनमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच दोन्ही बाजूंनी होणाऱ्या घडामोडीत वाढ झाली आहे.
इस्रायलच्या फौजांशी समोरासमोर टक्कर घेणं अवघड असल्यामुळे हमासने एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी गाझा पट्टीतून सुरूंगांचं एक जाळच तयार केलंय. यातून थेट इस्रायलमध्येच खुसखोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 2014 च्या युद्धात इस्रायलच्या ताकदवान फौजांना तोंड देतांना हमासला मोठाच उपयोग झाला होता.
रविवारी उध्वस्त केलेला सुरूंग हा शेकडो मीटर लांबीचा होता. तो इस्रायलमध्ये बऱ्याच आतपर्यंत शिरलेला होता. हा सुरूंग पूर्णत्वास नेण्याचे हमासचे प्रयत्न होते. ते इस्रायलने हाणून पाडले. हा सुरूंग इस्रायलच्या नागरी वस्त्यांपासून फक्त 1 किमी अंतरावर होता. हमासकडून याआधीही असे प्रयत्न झाले आहेत. परंतु इस्रायलने ते हाणून पाडले आहेत.