इस्रायल-हमास युद्धात लादेनचं 21 वर्षांपूर्वीचं पत्र व्हायरल; प्रसिद्ध वेबसाईटला का करावं लागलं डिलीट?

Osama Bin Laden Letter: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असणाऱ्या युद्धानं अनेक निष्पापांचा बळी घेतला. अद्यापही युद्धाचा हा वणवा शांत झालेला नाही. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.   

सायली पाटील | Updated: Nov 17, 2023, 11:35 AM IST
इस्रायल-हमास युद्धात लादेनचं 21 वर्षांपूर्वीचं पत्र व्हायरल; प्रसिद्ध वेबसाईटला का करावं लागलं डिलीट? title=
Israel hamas war Osama Bin Laden Letter connection latest update

Osama Bin Laden Letter: संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या इस्रायल आणि हमास युद्धामध्ये आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अतिशय अनपेक्षितरित्या नुकतंच या युद्धादरम्यान दहशतवादी ओसामा बिन लादेनचं एक 21 वर्षांपूर्वीचं पत्र समोर आलं आहे. लादेननं अमेरिकेला उद्देशून लिहिलेल्या या पत्रामध्ये त्यानं 9/11 चा हल्ला होण्यामागच्या काही कारणांचा उल्लेख केला आहे. इस्रायलकडून पॅलेस्टाईनवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांना अमेरिकेचा पाठिंबा हे त्यातलंच एक कारण, असं त्या पत्रात लिहिण्यात आलं होतं.

सूत्रांच्या माहितीनुसार लादेनचं 21 वर्षांपूर्वीचं हे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं, जिथं मोठ्या संख्येनं नेटकऱ्यांनी लादेननं अमेरिकेवर केलेल्या 9/11 हल्ल्याचं आणि या कृतीच समर्थन करताना दिसले. 'द गार्डियन'च्या संकेतस्थळावर लादेनचं हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं. अनेकांनी तिथंही आपली मतं नोंदवली होती. पण, त्यानंतर अनेक समुदायांकडून दहशतवादाला खतपाणी घालणारा तपशील तणाव निर्माण करत असल्याचं लक्षात येताच त्यांनी ही माहिती हटवली. 

अल कायदाच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया करणाऱ्या लादेननं 2001 मध्ये हे पत्र लिहिलं होतं. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या 9/11 हल्ल्यानंतर त्यानं हे पत्र लिहिल्याचं सांगण्यात आलं होतं. 

पत्रातील मजकूरात नेमकं काय होतं? 

पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देण्याच्या बाबतीतल त्यानं या पत्रात उल्लेख केला होता. पॅलेस्टाईन कैक दशकांपासून गुलामीत आहे आणि तुमच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षानं 11 सप्टेंबरनंतर याबाबत भूमिका मांडली नाही. पॅलेस्टाईनला बंधक केलं जाणार नाही, कतारण आम्ही त्यांच्या हाती असणाऱ्या बेड्या तोडणार आहोत, असं या पत्रात लिहिण्यात आलं होतं. इतकंच नव्हे, तर ख्रिस्तधर्मीचांचा खात्मा करत त्यांच्या रक्तानं आपण या अहंकाराची परतफेड करू असंही या पत्रात लादेननं लिहित सूडभावना व्यक्त केली होती.  

लादेनच्या या पत्रात पॅलेस्टाईनचा वारंवार उल्लेख करण्यात आला असून, त्यामध्ये अमेरिकेतील गैरव्यवहार, पॅलेस्टाईनवरील ताबा आणि इतर काही मुद्द्यांवर लादेननं मत मांडल्याचं पाहायला मिळालं. 

हेसुद्धा वाचा : पुढचं वर्ष सुट्ट्यांचं; 2024 मध्ये शनिवार, रविवारला जोडून नऊ सुट्टय़ा, आताच भटकंतीचे बेत आखा

'द रोलिंग स्टोन्स' या संकेतस्थळाच्या माहितीनुसार एका टिकटॉक युजरनं 14 नोव्हेंबरला व्हिडीओ शेअर केला. 'तुमही काहीसा वेळ काढून हे पत्र वाचा.... A Letter to America. वाचा आणि मग मला सांगा की तुम्ही काय विचार करता, कारण मला वाटतंय की इथं दृष्टीकोनावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे', अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ व्हायरल झाला. 

हा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर त्यावर अनेकांनी, खडबडून जागं करणारं पत्र... डोकं चक्रावणारी माहिती अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. लादेनच्या विचारांशी सहमत असणाऱ्यांचा आकडा पाहून अनेकांनीच या ट्रेंडची चौकशी व्हावी अशीही मागणी केली. मुळात द गार्डियनच्या संकेतस्थळावर 2002 पासून उबलब्ध होतं. पण, हे प्रकरण वाढताना पाहून ते तातडीनं हटवण्यात आलं.