Year End 2022: वर्षांचा शेवट झाला भयानक संकटाने; संपूर्ण जगाच्या कायम लक्षात राहतील अशा घडामोडी घडल्या 2022 मध्ये

 संपूर्ण जगाच्या कायम लक्षात राहतील अशा घडामोडी 2022 या वर्षात घडल्या. वर्षाचा शेवट देखील भयानक संकटाने झाला. जागतिक घडामोडींचा आढावा घेणारा हा वृत्तांत. 

Updated: Dec 29, 2022, 11:53 PM IST
Year End 2022: वर्षांचा शेवट झाला भयानक संकटाने; संपूर्ण जगाच्या कायम लक्षात राहतील अशा घडामोडी घडल्या 2022 मध्ये title=

Year End 2022: 2022 या वर्षात जागतिक पातळीवर अशा घडामोडी घडल्या आहेत ज्या कायम लक्षात राहतील. 2022 वर्षामध्ये ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीयने जगाचा निरोप घेतला(Queen Elizabeth of Britain passed away). यंदाच्या वर्षात इंग्लंडमध्ये इतिहास घडला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान बनले(Rishi Sunak of Indian origin became Prime Minister). श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळला(Inflation in Sri Lanka). पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ(Major political developments in Pakistan) झाली. तर, दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पुराने थैमान(Floods in Pakistan) घातले. या वर्षाचा शेवटी भयानक असाच झाला. कारण, अमेरिकेत भयानक हिमवादळ(US winter storm) आले.  मायनस 57 डिग्री तापमानात जिवंत राहण्यासाठी धडपड करावी लागली.

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या 96 व्या वर्षी निधन

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर शाही इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बकिंगहॅम ते वेस्टमिन्स्टर सभागृहापर्यंत त्यांची अत्यंयात्रा काढण्यात आली. सेंट जॉर्ज चॅपेलच्या दफनभूमीत राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आलं. सात दशकं ब्रिटनवर राज्य केलेल्या राणी एलिझाबेथ यांच्या कारकीर्दीत जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडल्या. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विस्टन चर्चिल ते पंतप्रधान लिझ ट्रस यांच्यापर्यंत अनेकांची कारकीर्द राणी एलिझाबेथ यांनी पाहिली होती. 

मार्च महिन्यात श्रीलंकेत महागाईनं अक्षरश: कहर केला

मार्च महिन्यात श्रीलंकेत महागाईनं अक्षरश: कहर केला. याठिकाणी दूध, भाजापाल्याचे भाव गगनाला भिडले होते. एक किलो टॉमेटोसाठी 150 रूपये तर साखरेचा दर किलोमागे 250 रूपयांवर पोहचला होता. पेट्रोल-डिझेल मिळत नसल्यानं लोकांना दोन दोन दिवस पेट्रोलपंपावर रांगा लावाव्या लागल्या. चीनकडून घेतलं कर्ज, कोरोनामुळे डबघाईला गेलेला पर्यटन व्यवसाय यामुळे श्रीलंकेची आर्थिक घडी विस्कटलीय. याला राज्यकर्तेच जबाबदार असल्याचं कारण देत श्रीलंकन जनता रस्त्यावर उतरल्याचं चित्रही पाहायला मिळालं.

इंग्लंडमध्ये इतिहास घडला आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान बनले

यंदाच्या वर्षात इंग्लंडमध्ये इतिहास घडला. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी पेनी मोरडॉन्ट यांना पराभूत करत इंग्लंडचे पंतप्रधान होण्याचा मान पटकावला. ऋषी सुनक यांना 180 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला. ब्रिटनमध्ये 45 दिवस पंतप्रधान पदावर राहिल्यानंतर आर्थिक धोरणांमुळे लिझ ट्रस यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून स्वतःहून माघार घेतली. त्यामुळे ऋषी सुनक पंतप्रधान होणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात होतं. 

पाकिस्तानात इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागलं

यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ घडली. पाकिस्तानच्या संसदेत तब्बल 174 सदस्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला. त्यामुळे इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर पाकिस्तान मुस्लीम लीगचे शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनले. देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नॅशनल असेंब्लीमध्ये शाहबाज शरीफ यांची बिनविरोध निवड झाली.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानवर यांच्यावर जीवघेणा हल्ला 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानवर यांच्यावरच्या 3 नोव्हेंबरला जीवघेणा हल्ला करण्यात आला. इम्रान खान यांचा लाँगमार्च सुरू असताना हल्लेखोरानं त्यांच्या दिशेनं 9 गोळ्या झाडल्या. सुदैवानं इम्रान खान या हल्ल्यानंतर बचावले. या हल्ल्यानंतर राजधानी इस्लामाबादमध्ये लॉकडाऊन करण्यात आलीय. तर इम्रान खान समर्थकांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शनं केली, त्यामुळे पाकिस्तानात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

पाकिस्तानात पुराचे थैमान

यंदाच्या वर्षात पाकिस्तानमध्ये पुराने अक्षरश: थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. या पुरामुळे तब्बल 1300 जणांचा मृत्यू झाला. तर  जवळपास पाच लाख लोक विस्थापित झाले.  पाकिस्तानातील बलुचिस्तान, खैबर पख्तुन्वासह दक्षिणेतील सिंध प्रांताला पुराचा सर्वाधिक फटका बसला. या पुरामुळे जवळपास 14 लाख घरांचं नुकसान झालं. या कठीण काळात जगभरातील देशांनी पाकिस्तानला मदतीचा हात दिला.

रशिया-युक्रेन युद्धानं जगाला हादरवले

यंदाच्या वर्षाची सुरूवात झाली तीच मुळी रशिया-युक्रेन युद्धानं...जगाला हादरवून सोडणा-या या युद्धाची पहिली ठिणगी टाकली ती रशियानं...फेब्रुवारीमध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केला. युक्रेन तीन ते चार दिवसात गुडघे टेकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पुतीन यांनी तिन्ही बाजूनं युक्रेनला घेरत राजधानी किव्हपर्यंत मजल मारत अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या होत्या. मात्र, युक्रेननंही जशास तसं उत्तर दिलं. अवघ्या सहा महिन्यात या युद्धात 13 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अद्यापही हे युद्ध सुरूच आहे. 

बांग्लादेशची राजधानी ढाक्यात इस्कॉन टेम्पलवर हल्ला आणि लुटमार

मार्चमध्ये बांग्लादेशची राजधानी ढाक्यात इस्कॉन टेम्पलवर 200 जणांच्या जमावानं हल्ला केला तसच लुटमार केली. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले. या घटनेचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही तीव्र पडसाद उमटले. बांग्लादेशातील अल्पसंख्यांक हिंदू असुरक्षित असल्याचा आरोप तिथल्या हिंदूंनी केलाय. हिंदूंच्या मंदिरांवर वारंवार असे हल्ले होत असताना बांग्लादेशने मात्र याविरोधात कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत त्यामुळे इथल्या हिंदू जनतेत कमालीचा संताप आहे. 

अमेरिकेत भयानक हिमवादळ

अमेरिकेला हिमवृष्टीचा जबरदस्त तडाखा बसलाय. बफेलो आणि न्यूयॉर्कमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतेय. जिवघेण्या थंडीनं आजवर 60 लोकांचा बळी घेतला. थंड वातावरणामुळे टेरेसी नदी गोठली. नदीत बर्फच बर्फ दिसतोय. ख्रिसमसच्या सुट्टीत घराबाहेर पडलेले लोकं अद्याप घरी पोहोचू शकले नाहीत. नागरिक घरातच लॉकडाऊन झालेत. अनेक भागातला वीजपुरवठाही खंडीत झालाय. बर्फवृष्टीमुळे विमानसेवा रद्द कराव्या लागल्यात त्यामुळे अनेक लोक एअरपोर्टवर अडकून पडलेत.