सेल्फीवाले माकड ठरले 'पर्सन ऑफ द इअर'

 या माकडाला इंडोनेशियातील पशू हक्कांसाठी काम करणाऱ्या एका समूहाने चक्क 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून नामांकीत केले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 6, 2017, 04:17 PM IST
सेल्फीवाले माकड ठरले 'पर्सन ऑफ द इअर' title=

जकार्ता : दात विचकावत काढलेला सेल्फी आणि त्यामुळे जगाचे वेधून घेतलेले लक्ष. त्यातून सुरू झालेला कॉपीराईटचा वाद, यांसह अनेक गोष्टींमुळे चर्चेत असलेले 'सेल्फीवाले माकड' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या चर्चेचे कारण असे की, या माकडाला इंडोनेशियातील पशू हक्कांसाठी काम करणाऱ्या एका समूहाने चक्क 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून नामांकीत केले आहे.

..अन माकडाने काढला सेल्फी

'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स' (पेटा) ही संस्था पशू हक्कांसाठी काम करते. या संस्थेनेच या माकडाच्या सेल्फीच्या हक्काबाबत आवाज उठवला होता. पेटाने या माकडाबद्दल म्हटले आहे की, हा माकड एक जीव आहे. वस्तू नव्हे. त्यामुळे याने काढलेल्या सेल्फीवर इतर कोणाचा हक्क नसून, त्या माकडाचाच आहे. या माकडाने 2011 मध्ये एका बेटावर ब्रिटीश नेचर फोटोग्राफर डेव्हिड स्लेटरचा कॅमेरा हाताळत असताना चुकून क्लिक पडला आणि चक्क माकडाचा सेल्फी निघाला. तेव्हापासून माकडाच्या सेल्फीवरून मालकी हक्काबाबत वाद निर्माण झाला होता.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण आहे सॅन फ्रान्सिस्को येथील. प्रकरण तसे गंमतीचे पण, तितकेच गंभीरही. एका माकडाने फोटोग्राफर डेव्हिड स्लाटरचा कॅमेरा घेऊन चक्क एक सेल्फी काढला. अर्थात, कोणतीही गोष्ट निरखून पाहणे आणि त्यासोबत माकडचाळे करणे हा कोणत्याही माकडाचा स्वभाव. अशाच एका फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यासोबत चाळा करत असताना माकडाकडून चुकून सेल्फी निघाला. काही महिन्यांपूर्वी हा फोटो सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यामुळे फोटोचे महत्त्व लक्षात घेऊन फोटोग्राफरने या फोटोच्या कॉपीराईटवर दावा केला.

...अखेर माकडाला सेल्फीचा कॉपीराईट नाहीच

दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले. माकडाने काढलेल्या सेल्फीवर हक्क कोणाचा? बऱ्याच विचारनंतर न्यायालयाने निकाल दिला की, कोणत्याही स्वरूपात एखाद्या व्यक्तीचा अधिकार प्राण्याला देता येणार नाही. त्यामुळे माकडाने काढलेल्या त्या सेल्फीवर फोटोग्राफरचाच हक्क असेन. पण, फोटोच्या कॉपीराईटमधून येणाऱ्या उत्पन्नातील २५ टक्के वाटा हा इंडोनेशियातील माकडांच्या विशेष प्रजातीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येईल.

कॅमेऱ्याच्या मालकालाच मिळाला माकडाच्या सेल्फीचा मालकी हक्क

फोटोग्राफर डेव्हिड स्लाटरने हा खटला जिंकला असून, सेल्फी कॉपीराईटमुळे मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी माकडांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी द्यावा लागणारा २५ टक्के वाटा सोडून उर्वरीत ७५ टक्के वाटा हा डेव्हिड स्लाटरला स्वत:कडे ठेवता येणार आहे. अशा प्रकारे माकडाने घेतलेल्या सेल्फीवरून निर्माण झालेल्या वादाचा कायदेशीर निपटारा झाला आहे.