लाहोर: इम्रान खान यांनी शनिवारी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इम्रान खान हे पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या शपथविधीची प्रचंड चर्चा रंगली होती. त्यामुळे आजच्या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे हा सोहळाही व्यवस्थितपणे पार पडला. मात्र, तरीही उपस्थितांमध्ये एका गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली होती.
इम्रान खान यांनी उर्दू भाषेतून पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी ते एकदा नव्हे तर दोनदा अडखळले. या शब्दांचे उच्चार अवघड असल्याने इम्रान खान यांना शपथ पूर्ण करताना बरीच कसरत करावी लागली. एका क्षणाला स्वत: इम्रान खान यांनाही हसू फुटले. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हे या शपथविधीला हजर होते. इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू वाघा बॉर्डरहून लाहोरला पोहचले आणि त्यानंतर इस्लामाबाद या ठिकाणी रवाना झाले. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुका झाल्यानंतर झालेल्या बदलांचे स्वागत केले आहे. आता दोन्ही देशांनी शांततेसाठी पुढाकार घेतला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले होते.
#WATCH Islamabad: Imran Khan fumbles during his oath taking speech pic.twitter.com/cPsgsjwgnD
— ANI (@ANI) August 18, 2018