बँकॉक : सध्या जगात २१ व्या फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह जोरात आहे. मात्र, आशिया खंडात फुटबॉल प्रेमींसाठी खळबळ उडविणारी बातमी हाती आलेय. थायलंडच्या चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये पर्यटनासाठी गेलेला थायलंडचा संपूर्ण १२ किशोरवयीन फुटबॉल संघ आपल्या प्रशिक्षकासह बेपत्ता आहे. गेल्या चार दिवसांपासून या संघाचा काहीही पत्ता लागलेला नाही. दरम्यान, येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बेपत्ता झालेल्या संघाचा शोध घेण्यात बाधा येत आहे. गुफेमध्ये शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये पर्यटनासाठी गेलेला थायलंडचा संपूर्ण किशोरवयीन फुटबॉल संघ गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. या संघाचा काहीही पत्ता लागलेला नाही. थायलंडच्या उत्तरेकडे असणाऱ्या थाम लुआंह नांग नोन गुहेमध्ये गेल्या शनिवारी थायलंडच्या किशोरवयीन फुटबॉल संघातील ११ ते १६ वर्ष वयोगटातील १२ खेळाडू आणि २५ वर्षीय प्रशिक्षक बेपत्ता झालेत.
छाया - एपी
चियांग राय प्रांतात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भू-स्खलनामुळे गुहेमध्ये हा संघ अडकला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ संघातील खेळाडूंच्या सायकल, बूट आणि इतर साहित्य सापडले होते. फुटबॉलपटूंचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे एक पथक गुहेमध्ये उतरले आहे, परंतु चार दिवसानंतरही त्यांचा शोध न लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
बचाव पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रचंड पावसामुळे गुहेमध्ये जाण्याचा रस्ता बंद झाल्याने शोध मोहिमेत अडचण येत आहे. तसेच गुहेमध्ये काही भागामध्ये ऑक्सिजनचीही कमतरता असल्याने बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामना करावा लागत आहे.