ChatGPT AI technology : मागील काही दिवसांपासून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात एआयच्या नावाखाली तंत्रज्ञान नेमकं किती पुढे गेलं आहे याचा अंदाज आपणा सर्वांनाच आला. अनेकांनी अनेक क्षेत्रांमध्ये हे तंत्रज्ञान आणत त्याचा सकारात्मकदृष्ट्या वापरही सुरु केला. पण, नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणं चॅट- जीपीटीचेही वाईट म्हणण्यापेक्षा काहीसे नकारात्मक परिणाम समोर आले आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. सध्या हा जबर धक्का शिक्षक वर्गाला बसताना दिसतोय.
येत्या काळात शिक्षकांच्या नोकऱ्या संकटात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागचं मूळ कारण ठरतंय, AI. गेल्या काही दिवसांपासून हार्वर्ड विद्यापीठातून त्यांच्या एआय विलीनीकरण कार्यक्रमातील गोष्टी प्रगतीपथावर असल्याचं पाहायला मिळत आहे. या योजनेअंतर्गत विद्यापीठातील शिकवण्याच्या पद्धतीमध्ये एआय, चॅट जीपीटीचा वापर केला जाईल. इतकंच नव्हे तर, येत्या काळात हार्वर्डमधील साइंस 50: इंट्रोडक्शन टू कंप्यूटर साइंस (सीएस50) या शैक्षणिक अभ्यासक्रमात चक्क एआयवर आधारित प्रशिक्षक नियुक्त केले जाणार आहेत. जिथं थेट तंत्रज्ञानाच्याच मदतीनं एक कृत्रिम तरीही सजीव वाटणारी आकृती प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं उत्तर देईल.
हे तंत्रज्ञान एआयच्या उन्नत GPT-3.5 किंवा GPT-4 मॉडेलवर आधारित असेल. सप्टेंबर महिन्यापासून विद्यापीठात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. विद्यापीठाशी संलग्न आणि नोंदणीकृत विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाच्या आधारे शिकवण्यात येईल ज्यामुळं विद्यार्थ्यांना एक नवा अनुभव यानिमित्तानं मिळणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात AI चा वाढता वापर पाहता येत्या काळात यामुळं अनेक कामं सुकर होतील, अशक्य प्रश्नांची उत्तरंही मिळतील हे खरं. पण, यामुळं मानवी सहभाग आणि योगदानाचं महत्त्वं कमी होऊन याची जागा आधुनिक तंत्रज्ञान घेईल ही बाब मात्र नाकारता येणार नाही. याच कारणानं आपल्या नोकऱ्यांवर गदा येणार का, या विचारानं शिक्षकवर्गाच्याही चिंता वाढू शकतात.
नोव्हेंबर 2022 पासून जगभरात एआय आणि चॅटजीपीटीची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. अतिशय वेगानं बदलणाऱ्या या तंत्रज्ञानामध्ये सातत्यानं काही नव्या गोष्टी जोडल्या जात आहेत. किंबहुना याची लोकप्रियता आणि त्याबबत असणारे अनेक कुतूहरपूर्ण प्रश्न पाहता गेल्या दोन महिन्यांमध्ये चॅटबॉटनं 100 मिलियन युजर्स मिळवले आहेत.