स्वर्गीय सुखाचा आनंद देणारं बालीमधील हँगिंग गार्डन

स्वार्गाचा आनंद देणारं गार्डन

Updated: Sep 3, 2019, 04:00 PM IST
स्वर्गीय सुखाचा आनंद देणारं बालीमधील हँगिंग गार्डन title=

बाली : माणूस आणि निसर्ग मिळून काय कमाल करू शकतो हे जर पाहायचं असेल तर बाली बेटावरील हँगिग गार्डन रिसॉर्टला तुम्ही एकदा भेट द्यायलाच हवी. पाहता क्षणीच प्रेमात पडाल असं हे ठिकाण आहे. बाली बेटावरच्या उबडच्या जंगलात एका डोंगराला लागून हा रिसॉर्ट तयार करण्यात आला आहे. हिरव्या जंगलावर मुकूटमणी असावा तसा हा रिसॉर्ट दुरून दिसतो. हँगिग गार्डनमधून तुम्ही 360 अंशाच्या कोनात निसर्ग न्याहाळू शकता. ज्यांना निर्सगाच्या सानिध्यात राहायचंय, ज्यांना शांतता हवीय त्यांच्यासाठी या ठिकाणाशिवाय दुसरी जागा शोधून सापडणार नाही.

रिसॉर्टच्या फ्युनिक्युलर रेल्वेनं तुम्हाला तुमच्या सूटपर्यंत जाता येतं. इथल्या दुमजली तरणतलाव हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. वास्तूकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या या तरणतलावाची 2015 मध्ये जगातल्या सर्वोत्तम तरणतलावांमध्ये नोंद झाली होती. तुम्ही जंगलाच्या सर्वात वरच्या भागात पोहत असल्याचा आनंद अवर्णनीय असा असतो. झोपड्यांच्या आकाराच्या सुट्समध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात आल्यात. रिसॉर्टच्या आवारात माकडांची उठाठेव सुरु असते.

तुमची फर्माईश असेल तर तरण तलावाच्या शेजारी रात्रीच्या विशेष जेवणाची व्यवस्थाही केली जाते. इंडोनेशियन संगीत आणि नृत्याची फर्माईशही पूर्ण केली जाते. जर तुम्ही स्वर्गीय सुखाच्या शोधात असाल तर एकदा तरी हँगिंग गार्डनला भेट द्यायलाच हवी.