गोल्डन ग्लोब रेस : भारतीय नौसैनिक अभिलाष टॉमी जखमी, मदतीसाठी प्रयत्न सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, तो सुरक्षित आहे आणि त्याचा ट्रॅकर काम करतोय

Updated: Sep 22, 2018, 12:42 PM IST
गोल्डन ग्लोब रेस : भारतीय नौसैनिक अभिलाष टॉमी जखमी, मदतीसाठी प्रयत्न सुरू title=

नवी दिल्ली : भारतीय नौसेनेचा 39 वर्षीय अधिकारी कमांडर अभिलाष टॉमी हिंद महासागराच्या सुदूर भागात फसलाय. अभिलाषनं प्रसिद्ध अशा 'ग्लोल्डन ग्लोस रेस 2018'मध्ये सहभाग घेतला होता. या रेसमध्ये अभिलाष तिसऱ्या क्रमांकावर असतानाच या भागाला वादळानं घेरलं... त्यामुळे स्पर्धेतील संभाव्य विजेत्यांपैंकी एक असलेल्या अभिलाषच्या बोटीचा खांब तुटला... त्यानंतर काही काळ अभिलाषचा संपर्क तुटला होता. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, तो सुरक्षित आहे आणि त्याचा ट्रॅकर काम करतोय... सध्या तो मदत मिळण्यासाठी रेस्क्यू टीमची वाट पाहतोय. आपल्या यॉटमध्ये तो एकटाच आहे.

अभिलाष टॉमी जखमी

दक्षण हिंद महासागराजवळ असताना वादळानं जहाजाला घेरल्यानंतर अभिलाष जखमी झालाय. सुस्साट वारं आणि वादळानं समुद्रात तयार झालेल्या 14 मीटर उंच लाटांनी अभिलाषच्या जहाजाला घेरलं. यामध्ये अभिलाषच्या पाठिला गंभीर दुखापत झालीय. 'गोल्डन ग्लोब रेस'च्या अधिकृत वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर काल रात्री उशिरा अभिलाषकडून आयोजनकर्त्यांना एक मॅसेज मिळाला. 'ईपीआयआरबी (ट्रॅकिंग) चालू आहे. स्ट्रेचरची आवश्यकता भासू शकते, चालू शकत नाही... बोटीत सुरक्षित आहे, पुढे जाऊ शकत नाही, सॅट फोन बंद आहे' असं अभिलाषनं आपल्या मॅसेजमध्ये म्हटलंय. त्यानंतर कोड रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. 

इंडियन नेव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, रेस्क्यू मिशनसाठी आयएनएस सतपुराला पाठवण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरापासून जवळपास तीन हजार किलोमीटर अंतरावर अभिलाष अडकला असल्याचं समजतंय. 

ऑस्ट्रेलियाच्या डिफेन्स फोर्सकडूनही रेस्क्यू मिशन सुरू करण्यात आलंय. 1 जुलैला फ्रान्समधून गोल्डन ग्लोब रेसला सुरुवात झाली होती. या स्पर्धेत 18 नाविकांनी सहभाग घेतलाय. 

गोल्डन ग्लोब रेस 

'गोल्डन ग्लोब रेस'मध्ये अभिलाष भारताचं प्रतिनिधित्व करतोय. यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना न थांबता एकटंच जगभर जलप्रवास करायचाय. या रेसचं वैशिष्ट्यं म्हणजे स्पर्धकांनी 1968 नंतर तयार झालेलं नवं तंत्रज्ञान आणि डिझाईनची नाव न वापरता या स्पर्धेत भाग घेतलाय. त्यामुळे, यात जीपीएस, नेव्हीगेशन यांसारखी उपकरणं वापरण्याची बंदी आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, गोल्डन ग्लोब रेसचं आयोजन ब्रिटनचे सर रॉबिन नॉक्स जॉन्स्टन यांच्याद्वारे 1968 मध्ये भारतनिर्मित नाव 'सुहैली'तून करण्यात आलेल्या पहिल्या नॉन-स्टॉप विश्व जलयात्रेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं करण्यात आलंय. अभिलाषनं 'थूरिया' नावाच्या 'सुहैली'च्या प्रतिकृतीतून या स्पर्धेत सहभाग घेतलाय.