मुंबई : तुम्ही नोकरी करणारे असाल तर आवर्जून नीट लक्ष देऊन ही बातमी वाचा... आणि फक्त वाचू नका, तर तुमच्या बॉसला, तुमच्या साहेबांनाही नक्की दाखवा...
नोकरी करावी तर जपानमध्ये आणि तीसुद्धा मायक्रोसॉ़फ्टमध्ये... असं तुम्हाला वाटलं तर ते अगदीच स्वाभाविक आहे... कारण मायक्रोसॉफ्टनं जपानमध्ये चक्क 'फोर डेज वीक' म्हणजेच आठवड्यातून फक्त चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी सुरू केलीय.
तिथल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवार, शनिवार, रविवारी सुट्टी असते. आता कर्मचाऱ्यांबरोबरच कंपनीही खूष आहे. कारण तीन दिवस सुट्टी मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता तब्बल ४० टक्क्यांनी वाढलीय.
एरवी रोज जेवढा टाईमपास कर्मचारी कामाच्या वेळात करत होते, तो टाईमपासही २५ टक्क्यांनी कमी झालाय. या प्रयोगामुळे ज्या कामाला पाच दिवस लागत होते, ते काम चार दिवसांत पूर्ण झालं. कर्मचाऱ्यांची 'स्ट्रेस लेव्हल'ही कमी झाली... त्यामुळे कार्यक्षमताही वाढली आणि कंपनीला फायदाही झाला.
चार दिवसांचं काम आणि तीन दिवसांची सुट्टीचा प्रयोग आवडल्याचं ९२ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितलंय. एकंदरीत काय, तर तीन दिवसांच्या सुट्टीचा हा प्रयोग तुफान हीट आहे. प्रत्येक कंपनीनं याचा विचार गांभीर्यानं नक्की करावा.