मुंबई : एकीकडे भारतात कोरोना रूगणांची संख्या घटतीय असं वाटत असताना कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. तर ब्राझीलमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू झालाय. ब्राझीलमध्ये 24 तासांत आढळून येणाऱ्या रूग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. शिवाय इथं आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन जगासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ब्राझिलमध्ये अक्षरश; मृतांचा खच पडला होता. किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसं कोरोनाला बळी पडत होती. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असं वाटत असतानाच पुन्हा ब्राझीलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं प्रवेश केलाय. इथं आतापर्यंत 2 लाख 78 हजार कोरोना रूग्णांचा मृत्यू झालाय. तर कोरोना रूग्णांची संख्या 1 कोटी 14 लाखांपेक्षा जास्त आहे.. आता दुसऱ्या लाटेनं ब्राझीलची चिंता आणखीन वाढलीये. कोरोना रूग्णांमुळे ब्राझीलमधल्या 15 राज्यांतील आयसीयू 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरलीयेत.
रिओ दे जेनेरिओ आणि साओ पाऊलो या शहरांमध्ये भयावह स्थिती आहे. पोर्टो ऍलेग्रे आणि कॅम्पो ग्रँड शहरातील आयसीयू फूल होण्याचा मार्गावर आहेत. दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलाय कोरोनाचा नवा स्ट्रेन... त्याचं नाव आहे पी-1..
पी-1 स्ट्रेन हा मूळ कोरोना विषाणूपेक्षा दुप्पट वेगानं पसरतो. जुन्या कोरोनाला रोखण्यासाठी तयार झालेल्या प्रतिकार शक्तीलाही चकवा देण्याची क्षमता पी-1मध्ये आहे. कोरोनातून ब-या झालेल्या रूग्णांना P-1स्ट्रेनमुळे लवकर लागण होऊ शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ब्राझीलमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होतंय. संक्रमणाचा वेग असाच राहिला तर जग पुन्हा धोक्यात येऊ शकतं.
ब्राझीलमध्ये कोरोना हाताबाहेर जाण्यास कारणीभूत ठरलाय राष्ट्राध्यक्ष बोलसेनारो यांचा अडेलतट्टूपणा.. त्यांनी सुरूवातीपासूनच कोरोनाला गांभीर्यानं घेतलं नाही. कोरोना म्हणजे साधा सर्दी-ताप असं म्हणून दुर्लक्ष केलं. स्वत: कोरोना बाधित झाल्यानंतरही मित्रांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या. इतकंच नाही तर अर्थव्यवस्था धोक्यात येईल असं कारण देऊन लॉकडाऊनला नकार दिला.
ब्राझीलमधल्या नव्या स्ट्रेनबाबत WHOअर्थात जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे. अनेक शास्त्रज्ञांनी ब्राझील ही नैसर्गिक प्रयोगशाळा झाली असल्याची भीती व्यक्त केलीये. कोरोनाच्या या नव्या खतरनाक स्ट्रेनला जगात फार पसरू न देणं, हे सर्वांसमोरचं आव्हान आहे.