जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटींच्या वर, 5 लाख रुग्णांचा मृत्यू

जगभरात कोरोनाचा कहर अजूनही थांबलेला नाही.

Updated: Jun 28, 2020, 04:55 PM IST
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटींच्या वर, 5 लाख रुग्णांचा मृत्यू title=

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. जगभरात कोरोना-संसर्ग झालेल्यांची संख्या आता एक कोटीच्या पुढे गेली आहे, तर कोरोनामुळे पाच लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरातील देशांमध्ये झपाट्याने पसरत आहे. Www.worldometers.info च्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे.

आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, जगभरातील देशांमध्ये कोरोना इन्फेक्शनची संख्या 1,00,81,545 वर गेली आहे. त्याच वेळी, या धोकादायक विषाणूमुळे 5,01,298 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या 54,58,369 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

अमेरिकेची परिस्थिती आणखी वाईट

सध्या अमेरिकेत कोरोना संसर्गाची अवस्था सर्वात वाईट आहे. जेव्हा चीनमध्ये कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव शिगेला होता तेव्हा अमेरिकेसारख्या देशांनी चीनवर तथ्य लपवल्याचा आरोप केला होता. पण आता चीनमधील परिस्थिती जवळजवळ सामान्य झाली आहे. पण अमेरिकेची अवस्था अत्यंत वाईट आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या 25 लाखांवर गेली असून सध्या ती झपाट्याने वाढत आहे.

अमेरिकेत, एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक 40,000 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत देशातील दोन राज्यांनी पुन्हा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी निर्बंध आणले आहेत. टेक्सासचे राज्यपाल यांनी शुक्रवारी सर्व बार बंद करण्याचे आदेश दिले आणि फ्लोरिडाने देखील बारसह दारू विक्रीवर बंदी घातली आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, अमेरिकेची ही दोन राज्ये देशातील अशा राज्यांच्या यादीत सामील झाली आहेत, जेथे पुन्हा एकदा संक्रमणामुऴे दैनंदिन व्यवहार बंद करावे लागले आहेत.

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येथे चिंतेचं कारण हे आहे की, मोठ्या संख्येने तरुण संसर्गग्रस्त होत आहेत जे मास्क न वापरता किंवा सोशल डिस्टंसिंगचं पालन न करता बाहेर पडत आहेत.