पेईचींग : भारताची डोकेदुखी ठरलेले शेजारी राष्ट्र चीन जगासमोरही नवे आव्हान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. सीमाविस्तार हा प्रमुख अजेंडा डोळ्यासमोर ठऊन काम करणाऱ्या चीनने आता जगातील सर्वाधिक लांब मारा करणारे क्षेपणास्त्र बनविण्याचा घाट घातला आहे. या क्षेपणास्त्रामुळे अवघे जग चीनच्या टप्प्यात येणार आहे.
पुढील वर्षी हे क्षेपणास्त्र चीनच्या लष्करात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये सोमवारी (20 नोव्हेंबर) प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार हे क्षेपणास्त्र जगभरातील कोणत्याही ठिकाणाचा अचूक वेध घेऊ शकते. डोंगफेंग-41 नावाचे हे क्षेपणास्त्र शत्रूच्या क्षेपणास्त्र आणि बचाव यंत्रणेलाही टक्कर देऊ शकते. या क्षेपणास्त्राची गती मिसाईल स्पीड मॅक 10 (आवाजाच्या गतीपेक्षाही 10 पटीने अधिक, सुमारे 12,900 किलोमिटर प्रती तास) पेक्षाही अधिक आहे.
सरकारी मीडिया हाऊस ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे की, 2012मध्ये या मिसाईलची घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत या मिसाईलचे 8 वेळा परिषक्षण करण्यात आले आहे. तसेच, पीपल्स लिबरेशन आर्मीत हे क्षेपणास्त्र 2018मध्ये सहभागी होईल. चीन आर्म्स कंट्रोल अॅण्ड डिसआर्मामेंट असोसिएशनचे वरिष्ठ सल्लागार शु गुआंगु यांनी म्हटले की, हे क्षेपणास्त्र लष्करात सहभागी झाल्यार लष्कराला अधिक मजबूती मिळणार आहे.
ग्लोबल टाईम्सने गुआंगूच्या प्रतिक्रीयेच्या हवाल्याने वृत्त देताना म्हटले आहे की, डोंगफेंग-41 हे तीन स्तरीय इंधन क्षेपणास्त्र आहे. याची मारक क्षमता कमीत कमी 12,000 किलोमीटर इतकी आहे. याचाच अर्थ चीन जगभरातील कोणत्याही ठिकाणावर यशस्वी मारा करू शकतो. हे क्षेपणास्त्र एका वेळी 10 अण्वस्त्रसज्ज शस्त्रे एकावेळी वाहून नेऊ शकते. तसेच, एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी माराही करू शकते.
दरम्यान, चीनने हे क्षेपणास्त्र अमेरिकेला डोळ्यासमोर ठेऊन बनवले असल्याचे रशियातील युद्धाभ्यासकांनी म्हटले आहे.