chaiwali.com... भारतीय चहाची ऑस्ट्रेलियन चाहती!

आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्तानं थोडी 'चाय पे चर्चा' तर व्हायलाच हवी... चहाची एक ऑस्ट्रेलियन चाहती... सहज म्हणून चहा करते काय... आणि 'बिझनेस वुमन ऑफ द इअर' ठरते काय...

Updated: Dec 15, 2017, 09:09 PM IST
chaiwali.com... भारतीय चहाची ऑस्ट्रेलियन चाहती!  title=

ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्तानं थोडी 'चाय पे चर्चा' तर व्हायलाच हवी... चहाची एक ऑस्ट्रेलियन चाहती... सहज म्हणून चहा करते काय... आणि 'बिझनेस वुमन ऑफ द इअर' ठरते काय...

सकाळ आणि चहा हे भारतातले समानार्थी शब्द.... झुंजुमुंजुच्या प्रहराला दूध आणि पाणी एकत्र येतात... चहाची भुकटी आणि तिच्या जोडीला आलेली साखरही सहज त्या दोघांमध्ये विरघळून जाते... उकळी येण्याच्या थोडं आधी त्यात किसलेलं आलं पडतं... हे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये समरसून गेले की जे अमृततुल्य मिश्रण तयार होतं.... चहा त्याचं नाव...

आवड आणि व्यवसाय... यांची सांगड!

भारतात अशाच पद्धतीनं चहा तयार केला जातो.... ग्रीन टी, ब्ल्यू टी, पर्पल टी ही सगळी आताची फॅड... पण भारताचा अस्सल पारंपारिक चहा... हा असाच तयार होतो... याच चहाची एक चाहती उपमा विरदी... ही सध्या ऑस्ट्रेलियात वकील आहे... पण ऑस्ट्रेलियातली तिची ओळख चायवाली अशीच आहे... उपमाचे आजोबा आयुर्वेदिक डॉक्टर होते... ते आयुर्वेदिक गुण असलेला चहा उत्तम बनवायचे... आजोबांची ही नात चहाच्या प्रेमात पडली... ती वाढली चंढीगढमध्ये आणि मग शिक्षणाच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियात गेली... ऑस्ट्रेलियाचं चहापेक्षा कॉफीवर प्रेम... पण या कॉफीप्रेमी देशातही तिनं चहाची आवड रुजवली.

कुठलीही मैत्री किंवा संवाद चहामुळेच खुलतो, सेलिब्रेशनही चहासोबत होतं. कंटाळा आला असेल तरी चहासोबत करतो आणि एखाद्या दुखाच्या प्रसंगीही चहाच उभारी देतो, असं तिचं ठाम मत... म्हणूनच तिनं ऑस्ट्रेलियात चहा विकायला सुरुवात केली. मेलबॉर्नमधली यशस्वी उद्योजिका म्हणून उपमा विरदी ओळखली जाते... भारतीय चहाचा आस्वाद भारतीयांना मिळावा म्हणून तिनं ऑस्ट्रेलियात भारतीय पद्धतीची चहा पावडर विकायला सुरुवात केली. तोही ऑनलाईन...

चायवाली डॉट कॉम

तिच्या 'चायवाली डॉट कॉम' या वेबसाईटवरुन ती वेगवेगळ्या प्रकारचे चहा विकते.... गेल्या दोन वर्षांपासून ती ऑनलाईन चहाचा व्यवसाय करतेय... याच व्यवसायासाठी तिला  ऑस्ट्रेलियातल्या 'बिझनेस वुमन ऑफ द इअर' पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. 

ऑस्ट्रेलियातले लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी पिऊन कंटाळले होते, त्यांना काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न उपमानं केला. भारतीत संस्कृतीतलं चहाचं महत्त्व आणि त्याचे उपयोग ऑस्ट्रेलियातल्या लोकांना पटवण्याचा तिचा प्रयत्न असतो... विशेष म्हणजे चहा विकण्यासाठी तिचं कुठलंही दुकान किंवा रेस्टॉरंट नाही.... ती ऑनलाईन चहा विकते. तिच्या वेबसाईटवर वेगवेगळ्या प्रकारचे चहा उपलब्ध आहेत. त्यामध्ये अकरा मसालेयुक्त चहा, टॅफिन फ्री चहा, इंग्लिश ब्रेकफास्ट टी. स्कीन ग्लो टी, गोल्डन चाय, जेवणानंतरचा डायजेस्टीव टी, चहा चॉकलेटस, चाय हॉट क्रॉस बन्स, चाय कॉकटेल, चहा पिण्याचे ग्लास, चहाबरोबर लावण्याच्या कँडल्स यांचा समावेश आहे.

चहाचे वर्कशॉप्स...

त्याचबरोबर अस्सल भारतीय चहा कसा करायचा? याची उपमा वर्कशॉप्सही घेते. उपमाची ही चायवाली वेबसाईट गेल्या दोन वर्षांत ऑस्ट्रेलियात लोकप्रिय झालीय. उपमा ही ऑस्ट्रेलियात एका लॉ फर्ममध्ये काम करते. त्याचबरोबर ती चहाचा हा व्यवसायही उत्तम सांभाळते. चहासाठीच एखादं रेस्टॉरंट सुरू करण्याचा तिचा विचार आहे. 

फक्त चहा आवडतो, एवढ्या एका निकषावर उपमानं तिचा व्यवसाय सुरू केला... आज चहानं तिला श्रीमंतही केलंय आणि लोकप्रियही... तुमच्या-आमच्यासारख्या अनेक महिलांसाठी उपमा वीरदी ही एक प्रेरणा आहे... आज आंतरराष्ट्रीय चहा दिनी चहा घेता घेता... अशीच एखादी आयडिया तुम्हालाही सुचेल...