Bruce Lee : जास्त पाणी प्यायल्याने ब्रूस लीचा मृत्यू; 49 वर्षांनंतर अखेर सत्य समोर

Bruce Lee Death : मार्शल आर्ट्सचा दिग्गज ब्रूस ली याचे 1973 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी मेंदूला सूज आल्याने त्याचा मृत्य झाल्याचे सांगितले होते. आता एका अभ्यासात असा वेगळाच दावा करण्यात आलाय

Updated: Nov 23, 2022, 05:27 PM IST
Bruce Lee : जास्त पाणी प्यायल्याने ब्रूस लीचा मृत्यू; 49 वर्षांनंतर अखेर सत्य समोर title=

Bruce Lee Death : हॉलिवूडपटांमधून नायकाच्या भूमिकेतून दिसणारा कराटे स्टार ब्रूस ली आपण अनेकदा पाहिला असेल. अमेरिकेत 1940 साली जन्मलेल्या ब्रूस लीचा (Bruce Lee death) अवघ्या 33 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. पण त्याला कोणी मारलं? किंवा त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत अनेक कथा आहेत. मात्र आता पुन्हा एकदा 49 वर्षांनंतर ब्रूस लीच्या मृत्यूबाबत चर्चा सुरु झाल्यात. 1973 मध्ये ब्रूस लीचा हॉंगकॉंगमध्ये (Hong Kong) मृत्यू झाला होता. आता पुन्हा ब्रूस लीच्या मृत्यूबाबच चर्चा होण्याचे कारण म्हणजे नुकताच समोर आलेला एक अहवाल.

मात्र डॉक्टरांनी सेरेब्रल एडेमा (Cerebral Oedema) म्हणजेच मेंदूला सूज हे ब्रूस लीच्या मृत्यूचे कारण असल्याचे म्हटले होते. अतिप्रमाणात पेन किलर (Pain Killer) खाल्ल्याने मेंदूला ही सूज आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण आता समोर आलेल्या अहवालात शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानंतर सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने ब्रूसलीचा मृत्यू झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

क्लिनीकल किडनी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. ब्रूस लीची मूत्रपिंडे अतिरिक्त पाणी पचवण्यास सक्षम नव्हती असेही यात म्हटले आहे. जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त होते आणि पाणी बाहेर टाकता येत नाही तेव्हा हायपोनेट्रेमिया ( what is Hyponatraemia) होतो.

ब्रूस लीलाही याच कारणामुळे तरुण वयातच आपला जीव गमवावा लागला, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. याशिवाय त्याची मूत्रपिंडेही जास्तीचे पाणी काढण्यात निकामी झाली, त्यामुळे त्याच्या रक्तातील सोडियमचे प्रमाण खूपच कमी झाले. ब्रूस लीच्या मृत्यूनंतर त्यांना विष देऊन मारण्यात आल्याचीही अफवा पसरली होती. मात्र, त्यानंतर डॉक्टरांनी पेन किलर घेतल्याने मेंदूला सूज येवून ब्रूस लीचा मृत्यू झाला.

हायपोनेट्रेमिया म्हणजे काय?

मायोक्लिनिकच्या अहवालानुसार, हायपोनेट्रेमियामध्ये एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील सोडियमचे प्रमाण सामान्यपेक्षा खूपच कमी असते. सोडियम हे इलेक्ट्रोलाइट आहे, जे शरीराच्या पेशीभोवती पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते. आपल्या शरीराची कार्यप्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असते. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमही पातळ होते आणि पेशींना सूज येऊ लागते. अनेक वेळा यामुळे लोकांचा मृत्यूही होतो. रक्तातील सोडियमचे सामान्य प्रमाण 135 ते 145 mEq/L असते. यापेक्षा रक्तात सोडियम कमी झाल्यास हायपोनाट्रेमिया होतो.

याच्यावर उपाय काय?

हायपोनेट्रेमियाची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना भेटावे.  तपासणी केल्यानंतर डॉक्टर तुम्हाला त्याचे औषध देऊ शकतात. हायपोनेट्रेमियावर योग्य वेळी उपचार केल्यास, जीव वाचवता येऊ शकतो. तसेच रक्तातील सोडियमचे प्रमाण सामान्य केले जाऊ शकते. वेळोवेळी आरोग्य तपासणी करूनही ही समस्या ओळखता येते.