नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेन (Russia ukraine war) यांच्यात गेल्या 13 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. हा संघर्ष सुरु असताना अनेक भारतीय नागरिक यूक्रेनमध्ये अडकले होते. त्यांना मायदेशी येण्यासाठी कोणताही पर्याय दिसत नव्हता. अशा वेळी भारत सरकारने ऑपरेशन गंगा (Operation Ganga) राबवले आणि सर्व भारतीयांना सुरक्षित तेथून बाहेर काढले. पण हे इतकं सोपं देखील नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Moodi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Putin) यांच्यासोबत चर्चा करुन भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवाहन केलं. त्यानंतर काही तासासाठी युद्धविराम घोषित करण्यात आला.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची आणि इतरांची सुटका करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन गंगा' राबवले. काही तास युद्ध थांबल्यानंतर लोकांना बाहेर काढले गेले. या अनोख्या बचाव मोहिमेअंतर्गत भारताव्यतिरिक्त इतर देशांतील लोकांनाही बाहेर काढण्यात आले. बांगलादेशातून नऊ लोकांना अशाच प्रकारे बाहेर काढल्याबद्दल पंतप्रधान शेख हसीना (PM Shaikh Hasina) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
'ऑपरेशन गंगा' अंतर्गत भारताने पाकिस्तान, नेपाळ आणि ट्युनिशियासह इतर अनेक देशांतील अडकलेल्या नागरिकांची सुटका केली आहे. यापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेने पाकिस्तानमधील एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्याने युक्रेनमधून बाहेर काढल्याबद्दल कीवमधील भारतीय दूतावास आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले होते.
मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की त्यांनी युक्रेनमधील सुमी येथून सर्व भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे. रशियन सैन्य सुमीवर जोरदार बॉम्बफेक करत होते, परंतु पीएम मोदी आणि भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे ते काही तासांसाठी पुढे ढकलण्यात आले आणि लोकांना तेथून तातडीने बाहेर काढण्यात आले.
गेल्या महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात आलेल्या निर्वासन मोहिमेचा भाग म्हणून आतापर्यंत, इतर देशांतील काही नागरिकांव्यतिरिक्त, सुमारे 18,000 भारतीयांना देखील विशेष विमानांद्वारे परत आणण्यात आले आहे. भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याबाबत पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या. याबाबत त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीही चर्चा केली. संघर्ष आणि हिंसाचार संपवून चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी दोन्ही नेत्यांना केले.
गेल्या दोन आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनचे आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे.