मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड कोलमॅन हेडली याच्यावर तुरुंगातच जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. मूळचा पाकिस्तानी पण, अमेरिकन नागरिक असलेल्या हेडलीवर कथित रुपात तुरुंगातील कैद्यांनी हल्ला केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर हेडलीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. सध्या त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय.
हेडलीवर हल्ला करणारे दोन हल्लेखोर सख्खे भाऊ आहेत. पोलिसांवर हल्ला केल्याच्या कारणावरून ते गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात कैद आहेत. या जीवघेण्या हल्ल्यात हेडली गंभीर जखमी झालाय. त्यानंतर त्याला नॉर्थ एवेस्टन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं.
डेव्हिड कोलमॅन हेडलीचं खरं नाव दाऊद सैय्यद गिलानी असं आहे. तो दहशतवादी संघटना लष्कर-ए-तौयबासाठी काम करत होता. २००२ ते २००५ दरम्यान हेडलीनं पाकिस्तानात लष्कराच्या पाच प्रशिक्षण शिबिरांत सहभाग घेतला होता. यात त्याला हल्ल्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्याचा कट रचण्याच्या आरोपाखाली अमेरिकेच्या शिकागो कोर्टानं हेडलीला २०१३ साली ३५ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तो शिकागोच्या फेडरल तुरुंगामध्ये शिक्षा भोगतोय... इथंच त्याच्यावर हल्ला करण्यात आला.