मुंबई : टेक्सास येथील एल पासो येथे असणाऱ्या वॉलमार्टमध्ये शनिवारी एका २१ वर्षीय हल्लेखोराने बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये जवळपास २० जणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास २५ हून अधिकजण या हल्ल्यात जखमी झाले. हल्लेखोर त्याच्यासमोर येईल त्या सर्वच व्यक्तींवर गोळ्या झाडत होता, असं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. वॉलमार्टजवळील सीएस्टा मॉलमधील लोकांवरही बेछूट गोळीबार करण्यात आला.
वॉलमार्ट येथे हल्ला करणाऱ्या या हल्लेखोराला ताब्यात घेतलं असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत आहे. वॉलमार्ट या स्टोअरमध्ये आठवड्याच्या सामानाची खरेदी करण्यात अनेकजण व्यग्र असतानाच हा हल्ला झाला होता. त्यामुळे घटनास्थळी गोंधळ आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.
उत्तर कॅलिफोर्नियामध्ये एका फूड फेस्टिव्हल दरम्यान, बंदुकधारी हल्लेखोराने तीन व्यक्तींचा बळी घेतल्याच्या घटनेनंतर अवघ्या सहा दिवसांतच बंदुकधारी इसमाने हल्ला करण्याची ही एकाच महिन्यातील दुसरी घटना आहे.. हा टेक्सासच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं म्हणत गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी या हल्ल्याचा निषेध केला.
वॉलमार्टमध्ये झालेल्या या हल्ल्यात तीन मेक्सिकन नागरिकांचा मत्यू झाला असून, यामध्ये ६ मेक्सिकन नागरिक जखमी झाल्याची माहिती मेक्सिकोचे पंतप्रकधान मॅनयूअल लोपेज ओब्राडोअर यांनी दिली.१९८४ मध्ये सॅन सिड्रो येथे झालेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं वृत्त समोर येत आहे.
वॉलमार्टमध्य़े घुसून बेछूट गोळीबार करणाऱ्या या हल्लेखोराचं वय २१ वर्षे असल्याचं सांगण्यात येत असून, तो टेक्सासमधी अॅलेन या भागातील असल्याचं कळत आहे. एल पासोच्या पूर्वेला हा परिसर आहे.