न्यूयॉर्क : जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर कंपनी असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेत. अॅमेझॉनच्या समभागांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने बेझोस यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
बेझोस यांच्याकडे एकूण ९०.९ अब्ज डॉलरची संपत्ती असून त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांना मागे टाकले आहे. बिल गेट्स यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीचे एकूण मूल्य ९०.७ अब्ज डॉलर इतके आहे. ब्ल्यूमबर्गने याबद्दलचे वृत्त दिले आहे. गुरुवारी न्यूयॉर्क शेअर बाजार सुरु होताच अॅमेझॉनच्या समभागांच्या किमतीत वाढ झाली.
अॅमेझॉनच्या समभागांमध्ये १.३ टक्क्यांची वाढ झाल्याने त्यांची किंमत १ हजार ६५ डॉलरवर जाऊन पोहोचली. त्यामुळे बेझोस यांच्या संपत्तीचे एकूण मूल्य ९०.९ अब्ज डॉलर इतके झाले. अॅमेझॉनच्या तिमाही महसुलात ३७.२ अब्ज डॉलर्सची वाढ होण्याची शक्यता ब्ल्यूमबर्गने व्यक्ती केली आहे.
कंपनीच्या मागील वर्षाच्या महसुली उत्पन्नाच्या तुलनेत ही वाढ २२ टक्के इतकी आहे. त्यामुळेच बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान बेझोस यांनी मिळवला आहे. गेल्या वर्षभराचा विचार केल्यास बेझोस यांच्या संपत्तीत १०.२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.