मुंबई | अलिबाबा या चिनी ऑनलाइन पोर्टलनं चीनमधल्या अर्थकारणाचा चेहरामोहराच बदलून टाकला... या पोर्टलचा जनक होता जॅक मा नावाचा एक असामान्य उद्योजक... अलिबाबाच्या अध्यक्षपदावरून तो आता पायउतार झालाय. आता निवृत्तीनंतर जॅक मा काय करणार आहे? असा प्रश्न जगभरातील अनेकांना पडला असेल.
चीनी अलिबाबा वयाच्या ५५ व्या वर्षीच निवृत्त होतोय. ज्यानंइमारत बांधली तोच इमारतीतून कायमचा बाहेर पडला आहे. जॅक मा हा जगातला सर्वात श्रीमंत चीनी गुंतवणूकदार आहे. अलिबाबा या सर्वात मोठ्या ऑनलाईन कंपनीचे त सर्वेसर्वा.
मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचं जिवंत उदाहरण ठरावं असं हे व्यक्तीमत्व. इंग्रजी भाषेचा शिक्षक ते चीनमधला सर्वात मोठा बिझनेस टायकून हा जॅक मा यांचा प्रवास भल्याभल्यांना हैराण करणारा आहे. १० सप्टेंबरला जॅक मा यांनी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केली आणि आधीच जाहीर केल्यानुसार अलिबाबा कंपनीतून निवृत्ती घेतली. कंपनीचे विद्यमान सीईओ डॅनिअल झांग आता अलिबाबाचे नवे चेअरमन म्हणून काम पाहणार आहेत.
उद्योग जगतात जॅक मा यांना मिळालेलं यश सहज मिळालेलं नाही. त्यासाठी परिश्रमांची पराकाष्टा करावी लागली.
जॅक मा आणि त्यांच्या साथीदारानं १९९९ मध्ये एक वेब पेज सुरू केलं. त्याआधी हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत ते दोन वेळा नापास झाले. दहा विद्यापीठांनी त्यांना प्रवेश नाकारला. ३० ठिकाणी नोकरी नाकारण्यात आली. इतकंच नाही तर अलिबाबासाठी गुंतवणूकदार शोधतानाही, त्यांना सातत्यानं अपयश आलं. पण जॅक मा डगमगले नाहीत.
औद्योगिक मानसिकतेला पाठिंबा दिला पाहिजे, सरकारच्या पुढाकारानं उद्योग उभे राहत नाही, त्यासाठी औद्योगिक मानसिकताच असावी लागते. जॅक मा यांच्या अलिबाबानं चीनी अर्थव्यवस्थेला नवं वळण दिलं आहे.
चीनच्या ग्रामीण ग्राहकाला खरेदीची नवी संधी दिली. छोट्या छोट्या उद्योगांना ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचवलं. २०१४ मध्ये अलिबाबा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये उतरला. त्यावेळी लाखो चीनी छोटे गुंतवणूकदार एका रात्रीत श्रीमंत झाले.
जॅक मा हे आता ग्लोबल उद्योजकतेचा चेहरा बनलेत. अलिबाबामागचा अलिबाबा म्हणून ते जगभरात फिरतात. उदयोन्मुख उद्योजकांना प्रेरणा देतात. अलिबाबामधून निवृत्त झाल्यानंतर पुन्हा शिक्षकी पेशात परतण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला आहे. चीनमध्ये टीचर मा या नावानं प्रसिद्ध असलेले जॅक मा आता खरोखरच नव्या पिढीवर उद्योजकतेचे संस्कार घडवणार आहेत.