वॉशिंग्टन : Al Qaeda New Chief Name: अल जवाहिरीचा खात्मा झाल्यावर आता अल कायदाची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार याची चर्चा सुरु झालीय. जवाहिरीच्या उत्तराधिका-यांमध्ये पहिलं नाव घेतलं जातंय सैफ अल अदेल. सध्या सैफ अल अदेल हा अल जवाहिरीचा सेकंड इन कमांड होता. सैफ अल अदेल हा इजिप्त आर्मीत कर्नलपदावरही होता. तर उत्तराधिकारी म्हणून आणखी एक नाव चर्चेत आहे. अब्दाल रहमान अल मघरेबीलाही जवाहिरीनंतर अल कायदातून मोठा पाठिंबा मिळेल अशी शक्यता आहे. अल मघरेबी हा जवाहिरीचा जावईही आहे.
डेली मेलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी सैफ अल आदिलला अल कायदाचा पुढचा प्रमुख बनवला जाऊ शकतो. सैफ अल-अदिल हा इजिप्शियन लष्करात अधिकारी होता. याशिवाय तो अल कायदाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. अल-कायदापूर्वी दहशतवादी सैफ अल-अदिल 1980 च्या दशकात मकतब-अल-खिदमत या दहशतवादी संघटनेचा भाग होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी सैफ अल अदेल याचे वय सुमारे 60 वर्षे आहे.
अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीला अमेरिकेच्या निंजा मिसाईलने ठार मारल्याची माहिती आहे. निंजा मिसाईल हे हेलफायर मिसाईलचं अॅडव्हान्स्ड रूप आहे. ड्रोनद्वारे हे मिसाईल मारले जाते. हे मिसाईल स्फोट घडवून आणत नाही. तर या मिसाईलवर अखेरच्या क्षणी सहा ब्लेड्स बाहेर येतात. या ब्लेड्स निर्धारित लक्षाला अक्षरशः जिवंत चिरुन काढतात. यातून टार्गेट वाचण्याची शक्यता अजिबात नसते. जवाहिरीलाही अशाच पद्धतीने अमेरिकेने चिरुन मारल्याची माहिती आहे.
अमेरिकेने अल कायदा या दहशतवादी संघटनेला मोठा दणका दिला आहे. अल कायदाचा म्होरक्या आणि जगातल्या टॉप टेन दहशतवाद्यांपैकी एक अयमान अल जवाहिरीला ठार मारण्यात यश आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ही घोषणा केली. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात जवाहिरीला ठार मारला. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 31 जुलैला अमेरिकेने काबुलमधल्या एका सेफ हाऊसवर हवाई हल्ले केले त्यात जवाहिरी ठार झाला. 31 जुलैला रात्री 9 वाजून 48 मिनिटांनी जवाहिरीवर हे ड्रोनस्ट्राईक करण्यात आलेत. अमेरिकेत झालेल्या 9/11 हल्ल्यांचा जवाहिरी मास्टरमाईंड होता. त्यामुळे तो ओसामा बिन लादेन एवढाच अमेरिकेसाठी मोस्ट वाँटेड होता.