Afghanistan Crisis : बानू प्रांतात तालिबानचं कंबरडं मोडलं, जिल्हाप्रमुखासोबत 50 जण ठार

याआधी बागलान प्रांतात अफगाण सैन्याने 300 तालिबान्यांचा खात्मा केला होता

Updated: Aug 23, 2021, 08:49 PM IST
Afghanistan Crisis : बानू प्रांतात तालिबानचं कंबरडं मोडलं, जिल्हाप्रमुखासोबत 50 जण ठार  title=

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने नवीन सरकार बनवण्याची तयारी सुरु केली आहे. पण, अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये तालिबान आणि अफगाणिस्तान सैन्यांमध्ये लढाई सुरू आहे. अफगाणिस्तानच्या बागलान प्रांतातील अंद्राबमध्ये तालिबान आणि अफगाण सैन्यामध्ये तुंबळ लढाई सुरू आहे. 

अफगाणिस्तानच्या लष्कराने बानू जिल्ह्यात तालिबानचं कंबरडं मोडलं आहे. तालिबानच्या जिल्हा प्रमुखांसह 50 तालिबान ठार झाले आहेत. तसंच सुमारे 20 तालिबान्यांना कैदी बनवण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे यात तालिबानचा बानू जिल्हा प्रमुखही मारला गेला आहे. त्याचे तीन साथीदारही ठार झाले आहेत. 

याआधी बागलान प्रांतातच अफगाण सैन्याने 300 तालिबान्यांचा खात्मा केला होता. बागलानच्या अंद्राबमध्ये लपून तालिबानींवर हा मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तालिबान्यांचं मोठं नुकसान झालं. या हल्ल्यात त्यांनी 300 तालिबान मारल्याचा दावा करण्यात आला आहे.

तालिबानने अफगाणिस्तानमधले 34 पैकी 33 प्रांत ताब्यात घेतले आहेत. 15 ऑगस्टला तालिबान्यांनी काबूलवर कब्जा केला. त्यानंतर आता सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला आहे. तालिबान आता केवळ पंजशीरपासून दूर आहेत. तालिबानी पंजशीरमध्ये हल्ला करण्यासाठी दाखल झाले. पण पंजशीरमध्ये त्यांना कडवं आव्हान मिळतंय.

अमरुल्लाह सालेह आणि अहमद मसूदच्या सेनेने तालिबानला नेस्तानाबुत करण्यासाठी रणनितीही तयार केली आहे. अहमद मसूद यांनी म्हटलं आहे की ते युद्ध करणार नाहीत, पण कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाला तीव्र विरोध करतील. तालिबान्यांबरोबरची बातचित यशस्वी झाली नाही तर मात्र युद्ध अटळ असल्याचं मसूद यांनी म्हटलं आहे.