लॉस एंजल्स : अमेरिकेतला एक व्हिडिओ सोशल मीडियावर खुपच व्हायरल होताना दिसतोय. अमेरिकेतल्या लॉस एंजल्सजवळचं धरणाच्या पाण्यात कोट्यवधी बॉल सोडतानाचा हा व्हिडिओ आहे. धरणाच्या पाण्यात काळे चेंडू सोडलेले या व्हिडिओतून दिसत आहेत. या धरणात एक दोन नव्हे तब्बल ९ कोटी ६० लाख चेंडू सोडण्यात आलेत. धरणाचा जवळपास सगळाच भाग या काळ्या चेंडूंनी व्यापलाय. काळ्या चेंडूनी धरणाच्या पाण्यावर चेंडूंची काळी चादरच तयार झालीय. या चेंडूंमुळे त्यामध्ये होडीही निट चालवता येत नाही. आता तुम्ही म्हणाल हे काळे चेंडू धरणात का सोडलेत?
Can you explain.? pic.twitter.com/eak7Lg666F
— Satisfying Videos (@Theslimevids) July 31, 2019
अनेकांना वाटलं की बाष्पीभवन रोखण्यासाठी हे चेंडू सोडले असावेत. यात थोड्या प्रमाणात तथ्य असलं तरी हे पूर्णतः खरं नाही. हे काळे चेंडू सोडण्यामागं एक महत्त्वाचं कारण आहे. धरणाचं पाणी एकाच ठिकाणी साठलेलं असतं. या साठलेल्या पाण्यावर सूर्याची किरण पडल्यामुळं पाण्यातील घटकांमध्ये ब्रोमाईड तयार होतं. हे ब्रोमाईड माणसासाठी घातक असतं. शिवाय शितपेयं बनवणाऱ्या कंपन्यांच्या मिश्रणावरही ब्रोमाईड विपरीत परिणाम करतो.
यावर एकच उपाय म्हणजे धरण बंदिस्त करणं... पण, एवढं मोठं धरण बंदिस्त करणं शक्य नाही. शिवाय एवढं पाणी बंदिस्त टाक्यांमध्येही साठवता येत नाही. यावर उपाय म्हणून काळ्या रंगाचे चेंडू या धरणात सोडण्यात आलेत. हे चेंडू बाष्पीभवन रोखतातच शिवाय सूर्यकिरणांचा आणि पाण्याचा संबंध येत नसल्यानं पाण्यात ब्रोमाईड तयार होत नाही. या आयडियाच्या कल्पनेमुळं लॉस एजंल्सच्या लोकांना अधिक चांगलं पिण्याचं पाणी प्यायला मिळालंय.