कोरोना : अमेरिकेत 90 हजार रुग्णांचा मृत्यू, 15 लाख लोकांना लागण

अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरुच

Updated: May 19, 2020, 09:52 AM IST
कोरोना : अमेरिकेत 90 हजार रुग्णांचा मृत्यू, 15 लाख लोकांना लागण title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या 90 हजारांच्या पुढे गेली आहे. येथे गेल्या 24 तासांत एकूण 779 लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 90,338 पर्यंत पोहोचला आहे. जगातील कोणत्याही देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही सर्वात जास्त आहे.

अमेरिकेत आतापर्यंत 15 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. अमेरिकेत आतापर्यंत दहा लाखाहून अधिक लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

एकीकडे कोरोना विषाणूचा अमेरिकेत कहर सुरु असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प सतत देशातील व्यवहार उघडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सोमवारीही त्यांनी अनेक ट्वीट केले ज्यात त्यांनी देशातील अऩेक गोष्टी उघडण्याविषयी सांगितले आणि विरोधकांवर आरोप केले की ते त्यांना यापासून रोखत आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिका पुन्हा उघडण्यास तयार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचे कौतुक केले आणि म्हटले की ते लोकांची शक्ती वाढविण्यात मदत करत आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, 'फ्रंटलाईनवर लढणारे हे औषध घेत आहेत, गेल्या आठवड्यापासून मीसुद्धा हे औषध घेत आहे. आणि मी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हे सुरु केलं आहे. मी दररोज एक गोळी घेतो.'

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियासाठी वापरले जाणारे औषध आहे, ज्याचं भारतात सर्वाधिक उत्पादन केले जाते. ही औषधे मोठ्या संख्येने भारतातून पाठविली जात आहेत. ज्याचे अमेरिकेनेही कौतुक केले.