चीनमध्ये 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण; सरकारी कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती समोर

Corona Virus : डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत चीनमध्ये कोरोनाची लाट शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. कोरोना नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय.

Updated: Dec 24, 2022, 06:34 PM IST
चीनमध्ये 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण; सरकारी कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती समोर  title=

Coronavirus Outbreak : चीनमधील कोरोना (China Corona) परिस्थितीबाबत रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने थैमान घातलं आहे. कोरोना नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. अशातच डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत कोरोनाची लाट शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरही लाखो लोकांनी सरकारविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. रूग्णांना रूग्णालयात औषधे, खाटा यांसारख्या सुविधाही मिळत नाहीयेत. दुसरीकडे आता चीनमधील परिस्थितीचा चेहरा उघड झाला आहे.

20 दिवसांत 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण 

अवघ्या 20 दिवसांत चीनमध्ये 250 दशलक्षाहून अधिक (25 कोटी) लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या 20 मिनिटांच्या बैठकीतून ही माहिती लीक झाली आहे. 1 ते 20 डिसेंबर दरम्यान, 24.8 कोटी लोकांना कोविडची लागण झाल्याचेही बैठकीच्या लीक झालेल्या कागदपत्रांमधून उघड झाले आहे. रेडिओ फ्री एशियानुसार, 20 डिसेंबर रोजी सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या कोविड प्रकरणांची संख्या वास्तवापेक्षा वेगळी होती.

पुन्हा कडक अंमलबजावणी

एका वरिष्ठ चिनी पत्रकाराने गुरुवारी रेडिओ फ्री एशियाला सांगितले की, दस्तऐवज खरा होता आणि सभेला उपस्थित असलेल्या कोणीतरी जाणूनबुजून आणि सार्वजनिक हितासाठी काम करत असलेल्या व्यक्तीने ते लीक केले होते. नवीन आकडेवारी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. कोरोनाबाबत पुन्हा कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

ती माहिती खरीच

एका वरिष्ठ चिनी पत्रकाराने गुरुवारी रेडिओ फ्री एशियाला सांगितले की, "ती कागदपत्रे खरी होती आणि त्या बैठकीत असलेल्या कोणी कोणीतरी सार्वजनिक हितासाठी ते लीक केली होती." चीनमधील नवीन कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोरोनाबाबतचं सत्य लपवण्याचा प्रयत्न चिनी सरकार करतंय का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

याआधी लंडनस्थित ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स कंपनी एअरफिनिटीने चीनमध्ये दररोज 10 लाख कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे म्हटले होते. तसेच 24 तासांत 5 हजारांहून अधिक रुग्णांचे मृत्यू झाल्याचेही सांगितले. तर दुसरीकडे माध्यमांच्या वृत्तानुसार, चीनमध्ये कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे 21 लाख मृत्यू होऊ शकतात. 

एएनआयच्या वृत्तानुसार, एअरफिनिटी मॉडेलचा अंदाज आहे की जानेवारी 2023 मध्ये कोरोना रुग्णसंख्येचा दर दिवसाला 3.7 दशलक्ष आणि मार्च 2023 मध्ये दररोज 4.2 दशलक्ष पर्यंत पोहोचू शकतो. डॉ. लुईस ब्लेअर, एअरफिनिटी येथील लस विभागाच्या प्रमुखांनी सांगितले की, चीन मोठ्या प्रमाणावर चाचणी करत नाही आणि लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांची नोंदही करत नाहीये. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.