नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) आपात्कालीन समन्वयकांनी एका देशाच्या नागरिकांविषयी तीव्र चिंता व्यक्त केलीय. हा देश म्हणजे सोमालिया... लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय मदत मिळाली नाही तर उन्हाळ्यात सोमालियातील २० लाखांहून अधिक महिला, पुरुष आणि लहान मुलं भूकबळी ठरू शकतात, असं संयुक्त राष्ट्रानं म्हटलंय.
यूएनचे अंडरसेक्रेटरी जनरल मार्क लोकॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळानंतर सोमालियाला जवळपास ७० करोड डॉ़लर मदतीची आवश्यकता आहे. पाऊस न पडल्यानं मुकी जनावरं व्याकुळतेनं प्राण सोडताना दिसत आहेत. शेती उद्ध्वस्त झाली आहे.
यूएननं केंद्रीय आपत्ती मदत निधीतून दुष्काळग्रस्त इथोपिया आणि केनिया या देशांसोबतच सोमालियातही दैनंदिन गरजेच्या गोष्टी, पाणी आणि खाण्याच्या वस्तूंची कमतरता पूर्ण करण्यासाठी ४.५ करोड डॉलर्सची रक्कम जमा केलीय.
सोमालियाची लोकसंख्या जवळपास १.५ करोड आहे. यामध्ये ३० लाख लोक केवळ कमीत कमी जेवणाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही स्थिती खूपच चिंताजनक आहे.