लोक नियम पाळत नसतील तर लॉकडाऊन करावेच लागणार- अजित पवार

आता नव्याने लॉकडाऊन करतोय म्हणजे पहिलं लॉकडाऊन चुकलं, असा अर्थ होत नाही

Updated: Jul 10, 2020, 06:56 PM IST
लोक नियम पाळत नसतील तर लॉकडाऊन करावेच लागणार- अजित पवार title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: काहीवेळा लोक नियम पाळत नसतील, तर लॉकडाऊनसारखे निर्णय घेणे भाग असते, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आपण इंग्लंडचे उदाहरण घेऊ शकतो. त्याठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे.

ठाण्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढवला

 

लोक नियम पाळत नसतील तर लॉकडाऊनसारखे निर्णय घेणे भाग आहे. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढतील तिथे लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशाराही अजित पवार यांनी दिला. मात्र, आता नव्याने लॉकडाऊन करतोय म्हणजे पहिलं लॉकडाऊन चुकलं, असा अर्थ होत नाही, असे स्पष्टीकरणही यावेळी अजित पवार यांनी दिले. 

Lockdown: 'पुणेकरांनो, काय खरेदी करायची असेल ती आत्ताच करुन घ्या'

लॉकडाऊनच्या निर्णयामुळे लोकांना त्रास होईल. परंतु, रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. पुण्यात दोन दिवसांनी लॉकडाऊनची सुरुवात होईल. लोकांना आवश्यक वस्तुंचा साठा करून ठेवण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हा  लॉकडाऊन कधीपर्यंत लागू असेल याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी सांगितले. तसेच आघाडी सरकार चालवताना आम्ही जबाबदारी घेतोय. नजरचुकीने काही गोष्टी घडल्या तर त्या सुधारायच्या असतात, असे वक्तव्यही यावेळी अजित पवार यांनी केले.