काँग्रेस भवनाच्या तोडफोडीनंतर संग्राम थोपटे म्हणाले....

काँग्रेस भवनाची तोडफोड निंदनीय आहे. मला या सगळ्याबद्दल माहिती नव्हते.

Updated: Dec 31, 2019, 11:18 PM IST
काँग्रेस भवनाच्या तोडफोडीनंतर संग्राम थोपटे म्हणाले.... title=

पुणे: ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेले काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवाजीनगर येथील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेमुळे पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या सगळ्या प्रकारानंतर संग्राम थोपटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, काँग्रेस भवनाची तोडफोड निंदनीय आहे. मला या सगळ्याबद्दल माहिती नव्हते. हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. या सगळ्यात कोणते कार्यकर्ते होते, याची मीदेखील माहिती घेत आहे. तसेच मला पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असल्याचे यावेळी संग्राम थोपटे यांनी सांगितले. 

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे हे ६ आमदार नाराज

पुणे शहर व जिल्हा कार्यालय शिवाजीनगर येथे एकाच इमारतीत आहेत. याठिकाणी आज दुपारच्या सुमारास संग्राम थोपटे यांचे काही समर्थक जमले. सुरुवातीला त्यांनी घोषणाबाजीला केली. यानंतर अचानक दगडफेक सुरु झाली. थोपटेंच्या काही समर्थकांनी कार्यालयात येत तोडफोड सुरु केली. त्यांनी शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या कार्यालयातील खुर्च्या, टेबलवरच्या काचा, खिडक्या फोडल्या. दगड मारून टीव्हीही फोडला. 

नाराज आमदारांची समजूत काढताना महाविकासआघाडीच्या नेत्यांची दमछाक