पुणे - इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली आलिशान एसयूव्ही चोरट्यांनी पळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. चार तारखेला पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. पर्वती परिसरात राहत असलेल्या सुरेंद्र वीर यांच्या मालकीची फॉर्च्यूनर गाडी पार्किंगमधून चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे फॉर्च्यूनर गाडीची सिक्युरिटी सिस्टीम सेन्सर बेस आहे. कुठल्याच प्रकारच्या चावीने ती उघडता येत नाही किंवा स्टार्ट करता येत नाही. गाडीसोबत थोडीतरी छेडछाड झाली तर लगेच सायरन वाजतो. इतकच नाही तर गाडीमध्ये उच्च दर्जाची जीपीएस सिस्टिम कार्यान्वित आहे. असं असताना उच्च दर्जाचं सुरक्षा कवच भेदून चोरट्यांनी ही गाडी लंपास केली.
सुरेंद्र वीर हे व्यावसायिक आहेत. त्यांनी त्यांची गाडी रात्री अकरा वाजता पार्किंगमध्ये लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी खाली आले तेव्हा त्यांना गाडी दिसली नाही. सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असता 1 सिल्वर रंगाची स्विफ्ट सोसायटीमध्ये शिरल्याच त्यांना दिसले. पुढच्या काही मिनिटांनी स्विफ्ट कार सोसायटीच्या बाहेर पडली.
स्विफ्ट कारच्या पाठोपाठच त्यांची पांढऱ्या रंगाची फॉर्च्यूनर बाहेर पडलेली सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. त्यामुळे चोरटे स्विफ्ट कार मधून आले आणि फॉर्च्यूनर घेऊन गेले असा संशय आहे. सुरेंद्र वीर यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
पुण्यामध्ये याआधी देखील एस यू व्ही चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर देखील चोरीला गेली होती. पोलिसांच्या तपासानंतर ती राजस्थानमध्ये सापडली. अशा प्रकारच्या चोऱ्यांमध्ये प्रोफेशनल चोरट्यांची गॅंग सक्रिय असल्याचा संशय आहे. एस यू व्ही च्या सिक्युरिटी सिस्टीम मध्ये शिरकाव करून ती चोरून घेवुन जाणे अतिशय अवघड आहे. त्यामुळेच या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.