इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचा पुतळा नको, पैसै वाडिया रुग्णालयाला द्या- प्रकाश आंबेडकर

ही जागा बौद्धिक गोष्टींसाठीच वापरायला हवी.

Updated: Jan 18, 2020, 09:55 PM IST
इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचा पुतळा नको, पैसै वाडिया रुग्णालयाला द्या- प्रकाश आंबेडकर title=

पुणे: इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याला माझ्यासह अनेकांचा विरोध आहे. त्यामुळे पुतळ्यासाठी वापरण्यात येणारा निधी वाडिया रुग्णालयाला द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

ते शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदू मिलची जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडिजसाठी देऊ केली होती. त्यामुळे ही जागा बौद्धिक गोष्टींसाठीच वापरायला हवी. मात्र, आता राज्यकर्ते या जागेचा वापर पुतळा उभारण्यासाठी करू पाहत आहेत. त्यामुळे मी उच्च न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करतो. न्यायालयाने पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा निधी वाडिया रुग्णालयाकडे वर्ग करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

काही दिवसांपूर्वीच महाविकासआघाडी सरकारने इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आधी पुतळ्याची उंची अडीचशे फूट होती. मात्र, आता हा पुतळा ३०० फुटांचा असेल. पुतळ्याची उंची वाढणार असल्याने आता या स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार असून आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता तो आता ९९० कोटींवर जाणार आहे.

२०११ साली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने या स्मारकाची घोषणा केली होती. यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर या स्मारकासाठीच्या कामाच्या मंजुऱ्या आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. ऑक्टोबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भुमिपूजनही करण्यात आले. मात्र, अद्यापही स्मारकाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झालेली नाही.