मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली समयसूचकता कौतुकास्पद- डॉ. सदानंद मोरे

मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेमागे कोणतेही राजकारण असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

Updated: Jul 22, 2018, 07:11 PM IST
मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली समयसूचकता कौतुकास्पद- डॉ. सदानंद मोरे title=
पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला न जाणं, हे अकर्म आहे. पण यामध्येच खरं कर्म दडलेलं आहे. संभाव्य अशांतता आणि इतर गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने एकदम योग्य निर्णय घेतला. त्यांनी दाखविलेली समयसूचकता अभिनंदनास पात्र असल्याचे मोरे यांनी सांगितले. 
 
मात्र, मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेमागे कोणतेही राजकारण असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. आंदोलन करणाऱ्या मराठा संघटनांच्या पाठिशी कोणताही राजकीय पक्ष नाही. कदाचित काही गोष्टी त्यांच्यापर्यंत व्यवस्थितपणे न पोहोचल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा. परंतु याला राजकारण म्हणणे उचित ठरणार नाही. किंबहुना आपण तसे म्हणू नये. परंतु, आरक्षणाची प्रक्रिया एका निर्णायक टप्प्यावर आली असताना मराठा समाजाने अशाप्रकारचे पाऊल उचलणे, निश्चितच योग्य नाही. मराठा मोर्चाने तुर्तास सबुरीची भूमिका घ्यावी, असा सल्ला सदानंद मोरे यांनी दिला.