यवतमाळ: पांढरकवडा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टी १ वाघिणीला ठार केल्यानंतर वनखात्यावर टीकेची झोड उठली होती. अनेकांनी वाघिणीला जेरबंद न करता थेट गोळ्या घालण्याच्या निर्णयावरून सरकारला धारेवर धरले होते.
दुसरीकडे पांढरकवडा परिसरातील गावकऱ्यांनी मात्र वाघिणीला ठार मारल्यानंतर दिवाळी साजरी केली. स्थानिक भाजप आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी दिवाळीनिमित्त नवीन कपडे आणि मिठाई भेट दिली. तसेच सरकार कायम तुमच्या पाठिशी राहील, असे आश्वासनही दिले.
वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभर ओरड सुरू असल्याबाबत गावकऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. नरभक्षक वाघिणीचा पुळका असलेल्या पाठीराख्यांनी वाघाची दहशत असलेल्या गावांमध्ये परिवारासह मुक्कामी राहून दाखवावे, असे आव्हान संतप्त गावकऱ्यांनी केले. शेतीचे सलग दोन हंगाम वाघिणीच्या दहशतीमुळे बुडाले. त्यामुळे आता उपजीविका कशी चालवावी असा पेच निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.