गंगाखेड कारखान्यातील गैरव्यवहारावर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब

साखर कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांच्यावर कारवाई का होत नाही?

Updated: Jul 23, 2018, 07:47 PM IST
गंगाखेड कारखान्यातील गैरव्यवहारावर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब title=

गंगाखेड साखर कारखान्याने शेतकरी आणि ऊसतोड वाहतूकदारांच्या नावे परस्पर 500 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. मात्र, याप्रकरणी गंगाखेड साखर कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होतोय. 

विधानपरिषदेत आलेल्या यासंदर्भातल्या लक्षवेधीला मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. या लेखी उत्तरात गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलून त्याचा फायदा स्वतःसाठी करून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. झी 24 तासने ही जुलै 2017 मध्ये या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता.

 

काय आहे नेमका घोटाळा?

गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी प्रा. लि. या कारखान्यातील अध्यक्ष, संचालक व कार्यकारी अधिकारी यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे 8 ते 10 हजार शेतकरी व ऊसतोड वाहतूकदार यांच्या नावावर पीक कर्ज, वाहतूक कर्ज घेऊन सदर कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना न देता सदर रकमेचा फायदा स्वतःसाठी करून फसवणूक केल्याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. 

या गुन्ह्याचा तपास एसआयटीमार्फत करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याच्या आजपोवतो करण्यात आलेल्या तपासात गंगाखडे शुगर अॅण्ड एनर्जी प्रा. लि. ने वेळोवेळी शेतकरी व ऊसतोड वाहतूकदार यांच्या नावे सन 2011-12 ते सन 2016-17 या कालावधीत युको बँक, रत्नाकर बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडीकेट बँक, आयसीआयसीआय बँक या सात बँकांकडून एकूण 499 कोटी 89 लाख रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे सरकारने मान्य केले.