यवतमाळ: गेल्या दोन महिन्यांपासून पांढरकवडा येथील टिपेश्वर अभयअरण्यात सुरु असलेल्या शोध मोहीमेनंतर अखेर टी-१ या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे. प्राथमिक माहितीनुसार शुक्रवारी रात्री वनखात्याचे एक पथक या वाघिणीला जेरबंद करण्याच्यादृष्टीने तिचा शोध घेत होते. मात्र, वाघिणीने अचानकपणे या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाघिणीवर गोळी झाडावी लागली आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला.
या वाघिणीने गेल्या दोन वर्षांमध्ये १३ जणांना ठार मारले होते. त्यापैकी नऊ जणांची शिकार टी-१ आणि तिच्या बछडय़ांनी केली, असा वन खात्याचा दावा होता. त्यामुळे या वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय वनखात्याने घेतला होता. मात्र, या निर्णयाला वन्यप्रेमींना कडाडून विरोध केला होता.
या वाघिणीला ठार मारण्यासाठी प्रसिद्ध शिकारी शाफत अली खान यांनादेखील पाचारण करण्यात आले होते. याशिवाय, विशेष प्रशिक्षण दिलेले इटालियन कुत्रेही वाघिणीच्या मागावर सोडण्यात आले होते. मात्र, तरीही महिनाभरापासून ही वाघीण शोध पथकांना गुंगारा देत फिरत होती.
या वाघिणीला वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मात्र, प्रथम वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा प्रयत्न करावा. वाघिणीला जेरबंद करण्यात यश न आल्यास ठार मारावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते.
वाघिणीला ठार मारल्यास तिच्या बछड्यांचे काय होणार, असा सवाल वन्यप्रेमींकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे टी-१ वाघिणीला ठार मारण्याऐवजी तिला जेरबंद करण्यात यावे, यासाठी वनखात्यावर दबाव आणला जात होता.
या वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. पाच शार्प शुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी आणि खासगी कर्मचाऱ्यांची फौज या ठिकाणी होती.
या वाघिणीच्या दहशतीमुळे केळापूर, राळेगाव, कळंब या ठिकाणची शेतीची कामे ठप्प झाली होती. या तालुक्यांमध्ये वाघिणीनं धुमाकूळ घातला होता.
पांढरकवडा वन विभागातील राळेगाव आणि पांढरकवडा या ठिकाणी या वाघिणीची सर्वात जास्त दहशत होती. लोणी, सराटी, खैरगाव, विहिरगाव, येडशी, मिरा, तेजनी या गावांमध्येही वाघिणीची चांगलीच दहशत होती.
मात्र, आता या वाघिणीला ठार मारण्यात आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.