मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, माजी मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, वरळीचे आमदार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १३ जून १९९० रोजी मुंबईत झाला. महाविद्यालयात असताना कविता करण्यापासून ते माजी कॅबिनेट मंत्री, वरळीचे आमदार अशी त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी पर्यावरण खाते संभाळले होते. आदित्य हे तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. राज्यातील लाखो तरुण त्यांच्या नेतृत्वाकडे आशा लावून पाहत आहेत. त्यांचे शर्ट, चष्मा, दाढीची स्टाइल तरुण फॉलो करताना दिसतात. दरम्यान तरुणांमध्ये त्यांच्या कार्सची चर्चाही होत असते.
आदित्य ठाकरे यांचे शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून झाले, त्यानंतर त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून इतिहासात पदवी पूर्ण केली. पदवी पूर्ण केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी के.सी. तसेच लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले.
बाळासाहेब, उद्धव ठाकरे ते आदित्य ठाकरेंपर्यंत सर्वांनाच आपण कार्यकर्त्यांच्या गराड्यात कार थांबवून भाषण करताना पाहिले आहे. ठाकरे परिवाराच्या ताफ्यातील कारबद्दल तरुणांमध्ये विशेष आकर्षण असते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मर्सिडीज-बेंझ जीएल-क्लासचा वापर करताना दिसतात. मर्सिडीज बेंझ या जर्मन कार कंपनीची ही फ्लॅगशिप एसयूव्ही आहे. ही कार कंपनीच्या सर्वात महागड्या वाहनांमध्ये गणली जाते. तसेच उद्धव ठाकरे खास पांढऱ्या रंगाच्या जीएलएसमध्ये दिसले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्यांच्याकडे जुनी बीएम़ब्ल्यू ५ जीटी आहे. या कारची किंमत ६.५ लाख रुपये आहे. निळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमधून ते अनेकदा कार्यकर्त्यांना अभिवादन करताना दिसतात. वरळी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानही आदित्य याच कारमध्ये दिसले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना कारमध्ये निळा रंग आवडत असल्याचे दिसते.
ब्लू लगून बीएमडब्ल्यू व्यतिरिक्त त्यांच्या ताफ्यात गडद निळ्या रंगाची लँड रोव्हर रेंज रोव्हर कार दिसते. अनेक मोठे सेलिब्रिटी ही कार हमखास वापरताना दिसतात. या कारची किंमत दोन कोटी रुपयांपर्यंत आहे. या दोन कार आदित्य ठाकरेंच्या आवडीच्या आहेत.
आदित्य ठाकरे यांनी २०१० मध्ये राजकारणात प्रवेश केला, त्यावेळी त्यांचे वय अवघे २० वर्षे होते. त्यावेळी रोहिंटन मिस्त्री यांच्या सच ए लाँग जर्नी या पुस्तकाला विरोध केल्याने ते चर्चेत आले होते. नंतर त्यांच्या विरोधाला व्यापक स्वरूप आले आणि शेवटी मुंबई विद्यापीठाला हे पुस्तक अभ्यासक्रमातून मागे घ्यावे लागले. २०१७ मध्ये आदित्य ठाकरे यांनी हजारो तरुणांना युवासेनेसोबत जोडण्याचे काम केले. त्यामुळे विद्यापीठात झालेल्या सिनेट निवडणुकीत शिवसेनेने १० पैकी १० जागा जिंकल्या.