मुंबई : गाडीची चावी हरवल्याने आपल्याला अनेकदा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच अनेकदा आपण घरातून निघताना किंवा कामाच्या ठिकाणी आपल्या गाडीची चावी विसरतो. त्यामुळे आपल्याला चावी घेण्यासाठी दुकानदाराकडे हेलपाटे मारावे लागतात. असा किस्सा प्रत्येक गाडीमालकासोबत एकदातरी घडतोच. पण आता हा मनस्ताप नाहीसा होणार आहे. कारण आता ऑटोमोबाईल क्षेत्रात चावीशिवाय सुरु होणारी गाडी येणार आहे. ज्या प्रकारे आपण स्मार्टफोन बोटाने अनलॉक करतो. त्याच प्रकारे ही गाडी सुरु करता येणार आहे. ह्युंदाई या प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनीकडून ही सुविधा देण्यात येणार आहे. ही सुविधा, पुढील वर्षी एसयूवी santa fe या गाडीत देण्यात येणार आहे.
पुढील वर्षी येणाऱ्या या कारला अनलॉक करण्यासाठी, ड्रायव्हरला आपले बोट गाडीच्या दरवाज्यावरील हँडेलवर असलेल्या सेंसरवर ठेवावे लागणार आहे. सेंसरवर बोट ठेवल्यानंतर त्याची पडताळणीची सूचना गाडीत असलेल्या फिंगरप्रिंट कंट्रोलरकडे जाणार. यानंतर गाडी अनलॉक होणार. याचप्रकारे ड्रायव्हरला गाडी सुरु करण्यासाठी स्टेरिंगजवळ असलेल्या स्कॅनिंग सेंसरवर बोट ठेवावे लागेल. यानंतर गाडी सुरु होणार. या टेक्नोलॉजीनुसार गाडीत अनुकूल वातावरणाची निर्मिती होईल. यासोबतच गाडीत बसल्यानंतर आपोआप पोजिशन, स्टेअरिंग तसेच साईड मिरर हे चालकाच्या गरजेनुसार अॅडजस्ट होणार आहेत.
येत्या काळात आम्ही स्मार्ट फिंगरप्रिंट टेक्नोलॉजीयुक्त गाडीत, तापमान आणि स्टेअरिंग पोजिशन स्वंयचलित पद्धतीने काम करणारी टेक्नोलॉजी समाविष्ट करणार आहोत, असे ह्युंदाई मोटारचे म्हणणे आहे. प्रत्येक ग्राहकाला ड्रायव्हिंगचा अद्भूत अनुभव देण्याची आमची इच्छा आहे. भविष्यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर आमच्या उत्पादनांमध्ये केला जाणार असल्याचा विश्वास ह्युंदाईचे अल्बर्ट बिरमन यांनी व्यक्त केला.
नव्या टेक्नोलॉजीमुळे आपले जीवन सुखमय झाले आहे. तसेच चोरट्यांनी देखील चोरीसाठी स्मार्ट पद्धतीचा वापर केला आहे. ह्युंदाईच्या वतीने या गाडीच्या सुरक्षेबाबतीत आपले मत व्यक्त केले. ही फिंगरप्रिंटप्रणाली खोट्या अंगठ्याची ओळख करणार आहे. त्यामुळे गाडीमालकांना या आधुनिक प्रणालीबद्दल चिंता वाटण्याचे कारण नाही. हे नवे तंत्रज्ञान जुन्या गाडीच्या चावीच्या तुलनेत पाचपट सुरक्षित आहे. या फिंगरप्रिंट टेक्नोलॉजीत सुरक्षिततेच्या गरजेनुसार सुधारणा करु शकतात.