Triumph Speed 400 And Scrambler 400X Launched: भारतीय बाईक क्षेत्रामध्ये होणारे बदल, रस्त्यांच्या रचना आणि त्यानुसार बाईकप्रेमींची वाढणारी संख्या पाहता आता देशात आंतरराष्ट्रीय ब्रँडसुद्धा त्यांचं नशीब आजमावताना दिसत आहेत. हिरो आणि हार्ले यांच्या एकत्रिकरणातून लाँच झालेल्या बाईकपाठोपाठच आणखी एक दमदार ब्रँड भारतात लाँच झाला आहे. हा ब्रँड आहे Triumph.
Triumph कडून नुकत्याच त्यांच्या दोन स्वस्त मॉडेल्सना भारतात लाँच केलं आहे. स्पीड 400 आणि स्क्रैम्बलर 440एक्स हे मॉडेल्स बजाजसोबतच्या पार्टनरशिप डिलमधून लाँच करण्यात आले आहेत. आता तुम्ही म्हणाल लाँच झाले म्हणजे ते ऑनरोड यायला मुलखाचा वेळ जाणार. पण, असं नाहीये. कारण, पुढच्याच आठवड्यापासून या बाईकची डिलिव्हरी सुरु होणार आहे. त्यामुळं आता नुकत्याच लाँच झालेल्या हार्ले डेविडसन एक्स440 आणि रॉयल एनफिल्डच्या मॉडेलना चांगलीच टक्कर मिळणार आहे.
ट्रायम्फच्या या दोन्ही बाईक्सना नियो-रेट्रो स्टाइल लूक देण्यात आला आहे. Scrambler 400X ला स्प्लिट सीट, डुअल चॅनल एबीएस, हेडलाईट ग्रिल, 19 इंचांचं फ्रंट आणि 17 इंचांचं रियर व्हील असा एकंदर लूक देण्यात आला आहे. तर, स्पीड 400 चा लूक सिल्व्हर एक्सेंट आणि वर्तुळाकार हेडलाईटमुळं आणखी प्रभावी ठरत आहे. भटकंतीसाठी निघणाऱ्यांना ही बाईक अद्वितीय अनुभव देईल असंही सांगण्यात येतंय.
ट्रायम्फ स्पीड 400 ची किंमत 2,33,000 रुपयांच्या घरात असून, ही मोटरसायकल स्पीड ट्विन 900 नं प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली आहे. स्क्रॅम्बलरची निर्मिती स्क्रॅम्बलर 900 पासून प्रेरित होत करण्यात आली आहे. डीओएचसी आणि लिक्विड कूलिंग सेटअपसोबत या बाईकला स्लिप आणि असिस्ट क्लच असे फिचर्स देण्यात आले आहेत. दोन्ही बाईक्सना 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. वजनाचं सांगावं तर, स्पीड 400 साधारण 170 किलो वजनाची आहे, तर स्क्रॅम्बलर 400 एक्सचं वजन 190 किलो इतकं आहे. त्यामुळं अनुभवानुसार तुम्ही योग्य त्या वजनाचं मॉडेल निवडू शकता. मग विचार कसला करताय? पुढच्या ट्रिपसाठी यामधीलच एखादी बाईक घेणार ना?