मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या

Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.

राजीव कासले | Updated: Feb 23, 2024, 09:26 PM IST
मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या  title=

Fingerprint Facts: मोबाईल हा आता माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच आता मोबाईलही गरजेची वस्तू बनला आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक कामं मोबाईलच्या माध्यमातून होत आहेत. शॉपिंगपासून जेवणापर्यंत, बँकेपासून वेगवेगळी बिलं भरण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. मोबाईलमध्ये आपल्या काही खासगी गोष्टीही असतात. यासाठी अनेक जण आपला मोबाईल लॉक करतात. यासाठी नंबर्स, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसाच वापर केला जातो. 

मृत्यूनंतर फिंगरप्रिंटसने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का?
ज्या पद्धतीने प्रत्येकाचा डीएनए (DNA) वेगळा असतो. त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचे फिंगरप्रिंट्सही (Fingerprints) वेगळे असतात. एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी फिंगरप्रिंट महत्ताचे ठरतात. आधारकार्ड, पासपोर्टसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठीही फिंगरप्रिंटसचा वापर केला जातो. व्यक्तीची ओळख आणि सुरक्षेसाठी फिंगरप्रिंटस महत्वाचा जबाबदारी बजावतात. अनेकजण आपला मोबाईलही (Mobile) फिंगरप्रिंटने लॉक करतता. फोनमध्ये असलेली  खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट इतर कोणी पाहू नयेत यासाठी पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिटने मोबाईल लॉक केला जातो. म्हणजे त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंटशिवाय मोबाईल अनलॉक होऊच शकत नाही.

मृत्यूनंतर फिंगरप्रिंटस कसे ओळखतात?
पण सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या फिंगरप्रिटने त्याचा मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? वास्तविक एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शरीरातील विद्युत वाहकताही (Electrical conductance) संपते आणि त्याच्या शरीरातील पेशीही काम करणे बंद करतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या बोटांचे ठसे विश्वसनीय ठरत नाहीत. मृत्यूनंतर शरीर ताठ होतं. अशा स्थितीत बोटेही शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे ताठ होतात. मृत्यूनंतर बोटांचे ठसे  मिळवणं जवळपास अशक्य ठरतं. पण फॉरेन्सिक तज्ज्ञ किंवा प्रयोगशाळेद्वारे मृत व्यक्तीचे ठसे मॅच केले जाऊ शकतात.

फॉरेन्सिक तज्ज्ञ जिवंत आणि मृत व्यक्तीच्या बोटांचे ठसे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ओळखू शकतात. फॉरेन्सिक लॅबमध्ये, सिलिकॉन पुटीचा वापर मृत व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेण्यासाठी केला जातो. सिलिकॉन पुटीवर बोटांचे ठसे स्पष्टपणे दिसतात, त्या ठशांची छायचित्र घेऊन फॉरेन्सिक तज्ज्ञ मृत व्यक्तीच्या ठशाची ओळख पटवतात. 

मृत्यूनंतर फिंगरप्रिंटने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का?
मृत्यूनंतर, एखाद्या व्यक्तीचा मोबाईल त्याच्या बोटांच्या ठशांचा वापर करून अनलॉक करता येऊ शकतो का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे.  वास्तविक, मोबाईल फोनचे सेन्सर मानवी बोटांमध्ये चालणाऱ्या विद्युत वाहकतेच्या आधारे काम करतात. मृत्यूनंतर शरीराताली अवयव, रक्तवाहिनी, श्वास, पेशी काम करणं बंद करतात. त्यामुळे मोबाईल इलेक्ट्रिक कंडक्टेन्स अभावी बोटांची ठशांची ओळख पटवू शकत नाही.