मोबाईल कनेक्शनसाठी चुकूनही आधार क्रमांक देऊ नका, कारण...

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरकारकडून शुक्रवारी हे निर्देश जारी करण्यात आले

Updated: Oct 27, 2018, 10:30 AM IST
मोबाईल कनेक्शनसाठी चुकूनही आधार क्रमांक देऊ नका, कारण...  title=

नवी दिल्ली : सरकारनं टेलिकॉम कंपन्यांना सद्य मोबाईल फोन ग्राहकांना किंवा नवं सिमकार्ड घेण्यासाठी आधार ई-केवायसी (e-KYC) लिंक करणं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरकारकडून शुक्रवारी हे निर्देश जारी करण्यात आलेत. 

सर्वोच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात दिलेल्या एका महत्ताच्या निर्णयात खाजगी कंपन्यांना आधारचा वापर बंद करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत दूरसंचार विभागानं दूरसंचार कंपन्यांसाठी विस्तृत दिशानिर्देश जारी केलेत.

यानुसार, विशिष्ट ओळख संख्येच्या (आधार) माध्यमातून 'आपल्या ग्राहकांची ओळख' (ई-केवायसी) चा वापर थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत. सोबतच कंपन्यांना या आदेशाच्या अनुपालनाचा अहवाल ५ नोव्हेंबरपर्यंत देण्यासही सांगण्यात आलंय. 

दूरसंचार विभागानं दिलेल्या आदेशानुसार, जर ग्राहकांनी नव्या कनेक्शनसाठी स्वेच्छेनं आधार दिलं तर त्याचा वापर ओळखपत्राच्या रुपात केला जाऊ शकेल... म्हणजेच, ऑफलाईन त्याचा वापर करता येऊ शकेल. परंतु, आधारची सक्ती मात्र ग्राहकांना केली जाऊ शकत नाही.