Ratan Tata Shared Story behind creation of TATA NANO : भारतीय ऑटो (Auto Sector) क्षेत्रामध्ये टाटा समुहाचं विशेष योगदान. सामान्यांनी कारचं स्वप्न पाहावं आणि टाटांनी ते पूर्ण करावं असं काहीसं अलिखित समीकरण दरम्यानच्या काळात झाल्याचं पाहायला मिळालं. हे समीकरण रुजवण्यात कारणीभूत ठरली ती म्हणजे या समुहाची सामान्यांकडे पाहण्याची दृष्टी आणि सामान्यांचा त्यांच्यावर असणारा विश्वास, सोबतच या साऱ्याचा जोडणारा एक दुवा, तो म्हणजे रतन टाटा.
टाटा समुहाला ज्यावेळी संपूर्ण जगात नावलौकिक मिळाला होता, तेव्हा या यशाला आपल्या कामाची पोचपावती समजत टाटांनी नव्या जोमानं काम सुरु केलं. नवनवीन संकल्पनांवर विचार करणाऱ्या टाटांनी सामान्य वर्गालाही केंद्रस्थानी ठेवलं आणि दैनंदिन जीवनातील काही प्रसंगांच्या आधारे त्यांनी या वर्गाला खिशात परवडणारी, EMI चं ओझं न होऊ देणारी एक कारची कल्पना अमलात आणली. ही कार होती, TATA NANO.
रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून टाटा नॅनो कारची कल्पना कशी सुचली याची सुरेख कहाणी सर्वांसमोर आणली होती. याविषयी सांगताना ते म्हणाले होते, 'हे वाहन तयार करण्यासाठी मला खरी प्रेरणा कोणी दिली तर ती स्कूटरनं प्रवास करणाऱ्या भारतीय कुटुंबानं. किंवा आई- वडिलांच्या मधोमध जागा नसतानाही अंग चोरून बसलेल्या, निसरड्या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या त्या लहान मुलानं'.
आपण स्थापत्यशास्त्राच्या शिक्षणामुळं काही शिकलो असू, तर ते म्हणजे डूडल करणं, असं सांगत त्यांनी नॅनो साकारण्याची गोष्ट पुढे नेली. 'सुरुवातीला आम्ही दुचाकी कशा पद्धतीनं अधिक सुरक्षित करता येईल याचा विचार केला. पण, हे दुचाकीचं डुडल चारचाकीमध्ये रुपांतरीत झालंय. त्याला खिडक्या आणि दारं नव्हती. फक्त एक बग्ग्घी होती. शेवटी मी ठरवलं, ही एक कारच असायला हवी. THE NANO ही कार कायमच आमच्या माणसांसाठी तयार केली होती', असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलेलं.
रतन टाटा आज या जगात नसले तरीही त्यांची दूरदृष्टी, समाजातील सर्व घटकांविषयी त्यांनी केलेला विचार आणि समाजभान या गुणामुळं त्यांना कायमच मानाचं स्थान मिळालंय आणि काळाच्या शेवटापर्यंतही हे स्थान मिळत राहील हे खरं.