बेंगळूरू - रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुजोरील्या वैतागलेले अनेक प्रवासी आता ओला, उबर सारख्या पर्यायांचा अधिक विचार करतात.
एका क्लिकवर हवी तेव्हा अगदी दारापाशी पिकअप आणि ड्रॉप देणारी ओला आता रिक्षाप्रवासही सुकर करणार आहे. लवकरच रिक्षामध्येही प्रवाशांना ऑटो कनेक्टटेड वायफाय सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.
ओला ऑटोरिक्षा ही नवी सुविधा देशभरातील ७३ शहरांत उपलब्ध होणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुरू होताच वायफायदेखील सुरू होणार आहे. पहिल्यांदा वायफाय कनेक्ट करताना प्रवाशांना काही लॉग ईन प्रोसेस करावी लागणार आहे.
ओलाचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार,' रिक्षामध्ये वायफायची सोय उपलब्ध करून रिक्षाला नवे स्वरूप देण्याचा आमचा विचार आहे. यामुळे आम्ही अधिकाधिक प्रवाशांसोबत जोडले जाऊ ' असा विश्वासही बोलून दाखवला आहे.
ओलाने केलेल्या दाव्यानुसार, ओला प्राईमने महिनाभरात २०० टीबीहून अधिक डाट्याचा वापर केला आहे. ओला ग्राहक सरासरी 20MB डाटाचा वापर करतात. २०१४ मध्ये ओलाची सुविधा सुरू झाली त्यानंतर सुमारे सव्वा लाख रिक्षा त्यांच्यासोबत जोडल्या गेल्या आहेत.