प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप असेलच. तुम्ही व्हॉट्सअॅपवर सेल्फी काढून पाठवता का? पाठवत असाल, तर आताच सावध व्हा. कारण, हा एक सेल्फी तुम्हाला भारी पडू शकतो. हा एक सेल्फी तुमची सगळी माहिती हॅक करण्यासाठी कामी येऊ शकतो.
सेल्फी काढायचे आणि व्हॉट्सअॅपवर मित्र-मैत्रिणींना पाठवायचे किंवा एखाद्या ग्रूपवर शेअर करायचे, हा अनेकांचा छंद. मात्र हा सेल्फी पाठवण्याचा नाद धोकादायक ठरू शकतो.
फोनमधील माहिती चोरण्यासाठी हॅकर्सनी इमेजबग हा नवा प्रकार शोधून काढला आहे. व्हॉट्सअॅपमध्ये सेल्फी काढून फिल्टर वापरल्यास हा बग अॅक्टिव्ह होतो. हा बग यूजरची वैयक्तिक माहिती, बँक खाती, पासवर्ड इत्यादी डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचवतो. या इमेजबगला अटकाव करणारी यंत्रणा व्हॉट्सअॅपनं निर्माण केली असल्यानं तशी चिंता नसली तरी थर्ड पार्टी अॅप्लिकेशन डाउनलोड करताना हा बग मोबाईलमध्ये शिरू शकतो. त्यामुळे कोणतंही अॅप डाऊनलोड करताना आणि वापरताना पुरेशी काळजी खबरदारी घ्या.