Mahindra Thar gets massive discount: मारुती सुझूकीने जिन्मी (Maruti Suzuki Jimny) गाडी लॉन्च केल्यानंतर प्रमुख प्रतिस्पर्धा असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. ऑफरोड सेक्टरमधील एसयूव्ही थारच्या (Mahindra Thar) मागणीवर जिन्मीमुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिन्मीच्या लॉन्चिंगनंतर काही प्रमाणात हा परिणाम दिसू लागल्याने महिंद्रा कंपनीने थारवर मोठी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्राने वेगवेगळ्या ऑफर्सअंतर्गत थारची किंमत कमी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. मात्र जिन्नी आणि थारच्या किंमतीमध्ये बराच फरक आहे. खरं तर जिम्नीचं बेस व्हेरिएंट हे थारपेक्षा 2 लाख रुपयांनी अधिक महाग आहे. मात्र गाडीचे फिचर्स आणि 5 डोअरच्या पर्यायामुळे अनेकजण थार ऐवजी जिम्नीला प्राधान्य देत असल्याचं दिसत आहे.
खरं तर काही दिवसांपूर्वी महिंद्राने थार गाड्यांची किंमत 1 लाख 5 हजार रुपयांनी वाढवली होती. थारच्या सर्वात स्वस्त व्हेरिएंटची किंमतही 55 हजार रुपयांनी वाढवण्यात आली होती. यामुळे थारच्या बेस व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत 10.54 लाखांपर्यंत गेली होती. जिन्मीच्या बेस व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत 12.74 लाख रुपये इतकी आहे. तर थारच्या 4x4 व्हेरिएंटची किंमत 13.49 लाख रुपयांपासून सुरु होऊन 16.77 लाखांपर्यंत जाते. किंमतीमधील हाच फरक अधिक वाढवण्याच्या दृष्टीने महिंद्राने आता थारच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही कपात सूट म्हणून लागू केली जाणार आहे.
महिंद्राने थारवर 65 हजार रुपयांची सूट देणार असल्याची घोषणा केली आहे. ही सूट थारच्या सर्वच व्हेरिएंटवर लागू होणार आहे. कंपनीने यापैकी 40 हजार रुपयांची सूट कॅशनमध्ये दिली असून 25 हजारांची सूट एक्सचेंज बोनस म्हणून दिली जाणार आहे.
जिन्मी लॉन्च झाल्यानंतरच पहिल्या टप्प्यात या गाडीला 30 हजारांहून अधिक बुकींग मिळाल्या आहेत. ही गाडी अद्याप रस्त्यावर उतरलीही नाही त्याआधीच तिची इतकी क्रेझ विरोधकांचं टेन्शन वाढवणारी आहे. काही आठवड्यांपूर्वीच थारने 1 लाख गाड्यांची विक्री केल्याचं जाहीर केलं. म्हणजेच जिन्मीच्या बुकींगने थारच्या तुलनेत एक चतुर्थांश टप्पा प्रत्यक्षात रस्त्यावर येण्याआधीच गाठला आहे. त्यामुळेच भविष्यात थारला जिन्मी विक्रीच्या आकडेवारीमध्ये चांगलीच टक्कर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.