मतदारांनो, व्हॉटसअप वापरत असाल तर सावधान...

८७,००० व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून होतंय मतदारांचं 'ब्रेन वॉशिंग'

Updated: Mar 25, 2019, 01:00 PM IST
मतदारांनो, व्हॉटसअप वापरत असाल तर सावधान...  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पहिल्याच टप्प्यात देशातील २० राज्यांमधील तब्बल ९१ मतदारसंघांसाठी प्रचार होणार आहे. प्रचाराला सुरुवातही झालीय. सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आणि प्रयत्न करू पाहत आहेत. या कामात यंदाही सोशल मीडिया आणि मीडिया ऍनालिस्ट यांचं काम महत्त्वाचं ठरताना दिसतंय. निवडणुकीचे चाणक्य सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना आणि त्यासाठी होता होईल तेवढा सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

देशात आत्ताही जवळपास ८७,००० व्हॉटसअप ग्रुप याच कामात लागलेले आहेत. लाखो मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आणि त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हे व्हॉटसअप ग्रुप निर्माण झालेत. या व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून राजकारणी नेते आणि राजकीय पक्षांची सकारात्मक छबी लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय. फेब्रुवारी २०१७ रोजी जाहीर झालेल्या अहवालानुसार, भारतात २० करोड व्हॉटसअप ऍक्टिव्ह युझर्स आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत ही संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या जवळपास ४३ करोड स्मार्टफोन युझर्स आहेत. यातील बहुतांशी लोक व्हॉटसअपचा वापर करतात. अशावेळी मतदारांचं 'ब्रेन वॉश' करण्यासाठी या व्हॉटसअप ग्रुपचा वापर राजकीय पक्षांकडून केला जातोय. 

व्हॉटसअप कसा होतोय वापर? 
फेक न्यूज पसरवण्यासाठी व्हॉटसअप हे अत्यंत सोप्पं प्लॅटफॉर्म बनलंय. तुमच्या ग्रुप्समध्ये जे मॅसेज येतात त्यांची सत्यता पडताळणी किती जण करतात? फारच कमी लोकांना आपण जो मॅसेज फॉरवर्ड करतो त्याबद्दल प्रश्न पडतात किंवा त्याची सत्यता तपासून पाहावी असं वाटतं. राजकीय पक्षांशी निगडीत युझर्स तर सर्रास असे मॅसेज फॉरवर्ड करताना दिसतात... आणि इतर अनेक युझर्स हेच मॅसेज सत्य मानून ते मॅसेज फॉरवर्ड करून इतरांनाही प्रभावित करतात. 

हेच काम फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातूनही केलं जातंय. रिलायन्स जियोच्या माध्यमातून देशात डिजिटल क्रांती आली असं म्हटलं जात 
असलं तरी डिजिटल साक्षरतेचं प्रमाण मात्र फारच कमी आहे. डाटा एवढा स्वस्त आहे की कुणीही याचा सर्रास वापर करू शकतो. व्हिडिओ, फेसबुक लाईव्ह आणि न्यूज चॅनल्सवर होणाऱ्य़ा चर्चासत्रांमुळेही लोकांच्या समजुती ठाम होतात... आणि त्याच आधारावर ते मतदानही करतात.

एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त २५६ युझर्स असू शकतात. अशावेळी ८७,००० ग्रुपच्या माध्यमातून २.२ करोड लोकांपर्यंत सहजच पोहचता येऊ शकतं. तुम्ही एका ग्रुपमधून कोणताही मॅसेज जास्तीत जास्त पाच लोकांना एकावेळी फॉरवर्ड करू शकता. लोकशाहीसाठी मात्र ही परिस्थिती चिंताजनक ठरतेय. अशावेळी 'झी २४ तास' आपल्या वाचकांना आणि प्रेक्षकांना आवाहन करतं की, कोणत्याही मॅसेजची सत्यता पडताळल्याशिवाय तो पुढे फॉरवर्ड करू नका... आणि फेक न्यूजपासून दूर राहा. आपल्या मताधिकाराचा योग्य वापर करा.