आज जागतिक पुरूष दिवस : सतत श्रीमंत राहण्याचं 'ब्रह्मास्त्र' असू द्या तुमच्याकडे...

आज जागतिक पुरूष दिवस आहे. कितीही म्हटलं तरी आज सर्व कुटूंबाची काळजी घेण्याची जबाबदारी ही पुरूषमंडळीकडे असल्याचं म्हटलं जातं.

Updated: Nov 19, 2018, 01:58 PM IST
आज जागतिक पुरूष दिवस :  सतत श्रीमंत राहण्याचं 'ब्रह्मास्त्र' असू द्या तुमच्याकडे... title=

मुंबई : आज जागतिक पुरूष दिवस आहे. कितीही म्हटलं तरी आज सर्व कुटूंबाची काळजी घेण्याची जबाबदारी ही पुरूषमंडळीकडे असल्याचं म्हटलं जातं. कारण एखाद्या कुटूंबाची आर्थिक स्थिती कमकूवत झाली, तर त्या घरातील कर्त्या पुरूषाला दोष दिले जातात. घराची आर्थिक स्थिती कमकुवत झाली, तर संपूर्ण घरावर निश्चितच याचा ताण पडतो. पण अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या सांभाळल्या तर घरात सतत 'लक्ष्मी'चा सहवास असतो. पैसे असले की अनेक अडचणी दूर होतात, ते पैसे कसे टिकवून ठेवता येतील, याचा हा मार्ग.

१) तुम्ही कितीही कमवा पण...

तुम्ही किती कमवता, तुम्हाला किती पगार आहे, यापेक्षाही जास्त महत्वाचं काही असेल, तर तुम्ही पगारातील किती रक्कम सेव्ह करतात. प्रत्येक पगाराला एक ठराविक रक्कम बचत करण्याची सवय असावीच. ही सवय तुम्हाला करोडपती होण्याकडे घेऊन जाते. आवश्यक गोष्टींनंतर अनावश्यक गोष्टीत होणार खर्च ओळखा, आणि त्या पैशांची बचत करा.

२) पैशाचा 'प्रवाह' ओळखा

तुम्ही बचत करून ठेवलेला पैसा, कुठे गुंतवायचा आहे, यावर नीट लक्ष द्या. पैसा गुंतवताना १० वेळेस विचार करा. कोणत्याही नेटवर्किंग किंवा प्रलोभन देणाऱ्या योजनेत पैसे टाकू नका. २ महिन्यात, ६ महिन्यात आणि वर्षभरात दुप्पट करून देतो, असं म्हणणाऱ्यांना योजनेत, पैसे देणे टाळा.

म्युच्युअल फंड, पब्लिक प्रोव्हिंडट फंड (PPF), नॅशनल पेन्शन स्कीम (NPS), सोनं अशा गोष्टींमध्ये हे पैसे गुंतवू शकता. जेथे पैसे परत मिळण्याची हमी आहे. तरूणांनी 'एसआयपी'मध्ये (systematic investment plan) पैसा गुंतवावा.  योग्य वेळी त्यांच्याकडे गाड़ी, पैसा आणि घर असेल.

३) वाट तुम्ही निवडा, कळपाच्या मागे आंधळ्यासारखं धावू नका

रिसर्च करा, वाचा आणि गुंतवणूक करा. इतरांमागे कळपासारखं जाऊ नका, तुम्ही अभ्यास करून तुम्ही वाट शोधा. गुंतवणूक कुठे कशी फायद्याची असेल हे पाहा, सुरूवातीला सर्वच पैसे एका ठिकाणी टाकू नका. तुम्हाला हळू हळू खूप काही शिकता येईल.

४) क्रेडीट कार्डचा वापर तात्काळ बंद करा

क्रेडीट कार्ड तुम्हाला कधीच श्रीमंत होवू देत नाही, हे कायम नीट लक्षात ठेवा. क्रेडीट कार्डने कधीच कर्ज घेऊ नका. अगदी अत्यावश्यक असेल तेव्हाच त्याचा वापर करा पण यानंतर वेळेत पैसे भरा आणि ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे भरा. तेव्हाच क्रेडीट कार्ड जास्त पैसे आकारत नाही. 

तुम्हाला पैसे हवे असतील, आणि तुम्ही क्रेडीट कार्डमधून कॅश काढत असाल, तर तसं करणे १०० टक्के टाळा. गरज पडल्यास न लाजता मित्राकडून पैसे उसनवार घेऊन गरज भागवा, पण क्रेडीट कार्डमधून पैसे वापरू नका.

५) आधी बचत, मग खर्च

नेहमी बचत आधी करा, आणि मग खर्च करा. पण खर्च करताना आवश्यक गरजा ठरवा, आणि त्यानंतर अनावश्यक खर्च टाळा. हातात पैसे आल्यावर सर्वच खर्च करणे अतिशय चूक आहे. ऐशआरामाच्या गरजा पुढे ढकला.