नवी दिल्ली: सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (BSNL) घरांमध्ये इंटरनेट (Internet) सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जबरदस्त ब्रॉडबँड प्लान आणलाय. फक्त 450 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खूप साऱ्या ऑफर मिळत आहेत. एअरटेल, जिओ आणि व्ही सारख्या खासगी ऑपरेटरला यामुळे दणका बसलाय.
टेक साइट केरलॅटिकॉमनने दिलेल्या वृत्तानुसार बीएसएनएलने भारत फायबर (Bharat Fiber) (FTTH) ब्रॉडबँड अंतर्गत Fiber Basic प्लान सुरू केलाय. या प्लानची किंमत 449 रुपये आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्लानला 90 दिवसांसाठी जबरदस्त ऑफर मिळत आहे.
बीएसएनएलच्या या ब्रॉडबँड कनेक्शनचा विशेष फायदा म्हणजे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना कोणतेही इन्स्टॉलेशन शुल्क द्यावे लागणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएलच्या या फायबर प्लॅन ऑफरअंतर्गत वापरकर्त्यांना 30 एमबीपीएस स्पीड देत आहे. याव्यतिरिक्त, पहिल्या तीन महिन्यांसाठी 3300 जीबी डेटा देण्यात येत आहे.
या ब्रॉडबँड कनेक्शनसह एक टेलिफोन लाइन देखील दिली जात आहे. आपण या फोनवरून तीन महिन्यांपर्यंत कोणत्याही नेटवर्कमध्ये अमर्यादित कॉलिंग करू शकता.
बीएसएनएलच्या ब्रॉडबँड कनेक्शनमधील या सर्व ऑफर फक्त तीन महिन्यांसाठी आहेत. वैधता संपल्यानंतर वापरकर्त्यांना दरमहा 599 रुपये द्यावे लागतील.
बीएसएनएलची ही ऑफर नवीन नाहीय. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीने असा प्लान आणला होता. कमी किंमतीमुळे हा प्लान देशभरात लोकप्रिय झाला. घर आणि ऑनलाइन कामांमुळे आजकाल ब्रॉडबँड कनेक्शनची मागणी वाढली आहे. या नवीन ऑफरमुळे त्यांचे ग्राहक देशभर वाढतील अशी बीएसएनएलला आशा आहे.