घड्याळ डाव्या हातावरच का बांधलं जातं? यामागे आहे शास्त्रीय कारण

General Knowledge : अचूक वेळ समजावी यासाठी आपण प्रत्येकजण घड्याळ्याचा वापर करतो. आपल्यातील 99 टक्के लोकं घड्याळ डाव्या हातावर बांधतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे नक्की कारण काय आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 19, 2023, 01:59 PM IST
घड्याळ डाव्या हातावरच का बांधलं जातं? यामागे आहे शास्त्रीय कारण title=

General Knowledge : सध्याच्या युगात प्रत्येकाचं आयुष्य हे खूप धावपळीचं, घड्याळ्याच्या (Watch) काट्यावर चालणारं बनलंय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, मॉर्गिंक वॉक असो की व्यायाम असो, ऑफिसला जाण्यासाठी- घरी येण्यासाठी, ट्रेन, बस पकडण्यासाठी प्रत्येक काम वेळेनुसार ठरवलं जातं. दिवसातले चोवीस तास माणून घड्याळ्याच्या काट्यावर अवलंबून असतो. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजीटल घड्याळ्यांची क्रेझ आहे. पण डिजीटल असो की स्पोर्ट्स वॉच असो 99 टक्के लोकं घड्याळ डाव्या हातावर बांधतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, घड्याळ डाव्या मनगटावरच का बांधलं जातं. 

घड्याळ डाव्या हातावरच का बांधलं जातं?
एका सर्वेक्षणानुसार (Research) जगात डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांची संख्या 10 ते 12 टक्के इतकी आहे. म्हणजे जवळपास 90 टक्के लोकं उजव्या हाताने काम करतात. अशात उजव्या हाताने काम करताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून डाव्या हातावर घड्याळ बांधण्याची प्रथा रुढ झाली. शिवाय काम करताना डाव्या हाताचा वापर कमी होत असल्याने घड्याळ सुरक्षितही राहातं. त्यामुळेच घड्याळ बनवणाऱ्या कंपन्या डाव्या हातावर बांधलं जातं हा विचार करुनच घड्याळ्याची रचना करतात. पुरातन काळात घड्याळ खिशात ठेवली जात होती. त्याकाळातल्या अधिकारी वर्गात घड्याळ खिशात ठेवणं मानाचं मानत होते. पण ही झाली सामान्य गोष्ट, यामागे शास्त्रीय कारणही (Scientific Reason) आहे. 

टेबल क्लॉक किंवा भिंतीवर लावलं जाणाऱ्या घड्याळ्यात 12 हा अंक वरच्या दिशेला असतो. चोवीस तासांच्या दिवसात बारा वाजल्यापासून वेळ सुरु होते. हा विचार करुनच हातावरची घड्याळंही बनवली जातात. म्हणजे घड्याळ डाव्या हातावर बांधल्यावर बारा हा अंक वरच्या दिशेला असतो. पण उजव्या हातावर बांधल्यास 12 हा अंक खालच्या बाजूला जाईल. तसंच घड्याळ्याची चावीदेखील उलट्या बाजूला येईल. आणि त्यामुळे घड्याळ्याला चावी देणं अवघड होऊन बसतं. म्हणूनच नव्वद टक्के लोकं घड्याळ डाव्या हातावर बांधतात. 

घड्याळ्याचा शोध कधी लागला?
फार पुरातन काळात माणसाला दिवस आणि रात्र या दोनच वेळा माहित होत्या. कालांतराने मनुष्याच्या सावलीच्या लांबीवरुन वेळ ओळखली जाऊ लागली. त्यानंतर जळती मेणबत्ती, सरकती वाळू यांचा वापर वेळ मोजण्यासाठी केला जात होता. पहिलं यांत्रिक घड्याळ बनवण्यासाठी अकरावं शतक उजाजावं लागलं. पोप सिल्व्हिस्टर या व्यक्तीने अकराव्या शतकात पहिलं यांत्रिक घड्याळ बनवल्याचा उल्लेख आढळलतो. 1594 साली गॅलिलिओने कालमापनासाठी घड्याळ्यात लंबकाचा वापर केला आणि घड्याळ्याच्या शोधात ऐतिहासिक क्रांती झाली. 

1605 साली जर्मनीतल्या  पीटर हेनलेन या कुलूप दुरूस्त करणाऱ्या एका कारागीरानं खिश्यात ठेवता येईल अशा घड्याळ्याचा शोध लावला. यात त्याने लंबकाऐवजी बॅलेन्स स्प्रिंगचा वापर केला. यामुळे घड्याळ्याची अचूकता वाढली.