मुंबई : वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन कंपन्यांमध्ये जोरदार टक्कर होऊ घातली आहे. ज्याचा थेट आणि मुबलक फायदा ग्राहकांना होणार आहे. या दोन्ही कंपन्यांचा आपापल्या संकेतस्थळावरून ऑनलाईन मेगा सेल लवकरच सुरू होत आहे. फ्लिपकार्टच्या सेलच्या तर, तारखाही नक्की झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार फ्लिपकार्टचा 'बिग शॉपिंग डेज' सेल १३ मे पासून सुरू होत आहे. तो १६ मे पर्यंत असणार आहे. फ्लिपकार्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या तारखांची पुष्ठी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
दरम्यान, अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष (कॅटेगरी मॅनेजमेंट) मनीष तिवारी यांनी सांगितले की, यंदाच्या उन्हाळ्यात आम्ही मोठ्या इवेंटला फारसे प्राधान्य न देता काही छोट्या पण एक्सायटींग सेलची एक मालिकाच तयार केली आहे. याची मालिकांची अधिकृत माहिती अॅमझॉनच्या संकेतस्थळावर लवकरच येणार आहे. अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मालिका म्हणजे, वार्षीक इव्हेंटचेच छोटे रूप आहे. या इव्हेंटमध्येही ग्राहकांना ७० ते ८० टक्के डिस्काऊंट मिळू शकतो. स्मार्टफोन आणि कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्सवर अतिरिक्त १० ते २० टक्क्यांपर्यंतची सूट मिळू शकते. भारतात ऑनलाईन सेल्सची ६० टक्के बाजारपेठ याच कॅटेगरीने व्यापली आहे.
दरम्यान, आगामी सेल डोळ्यासमोर ठेऊन दोन्ही कंपन्यांनी आपल्या वस्तूंचा साठा करण्यास एप्रिलपासूनच सुरूवात केली आहे. इंडस्ट्रीच्या अभ्यासकांच्या मते या कंपन्या दिवाळी फेस्टिवल सेल्सच्या दरम्यान जितका माल खरेदी करते त्याच्या ७० ते ८० टक्के हिस्सा विक्रीसाठी ठेवते.